वाळकी, पुढारी वृत्तसेवा: नगर तालुक्यातील 11 गावांमध्ये लम्पी स्कीन आजाराने बाधित 19 जनावरे आढळली आहेत. यातील सात जनावरांची आरोग्य स्थिती सुधारली असून, ही लम्पी मुक्त झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी, दूध उत्पादकां पुढील चिंता वाढली होती. लम्पी आटोक्यात आणण्यासाठी नगर तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना राबविल्या जात असून, जनावरांचे लसीकरण वेगात सुरू आहे.
तालुक्यातील वाळकी, कोल्हेवाडी, खंडाळा, डोंगरगण, राळेगण म्हसोबा, सांडवा, भोयरेपठार, इस्लामपूर, विळद, अरणगाव, मठपिंप्री गावांमध्ये लम्पी आजाराने बाधित जनावरे आढळली आहेत. या गावांमधील एकूण 19 जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाबरोबरच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी शेतकर्यांच्या मदतीसाठी धावपळ करत आहेत. त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभागाकडून खासगी पशुवैद्यकीयांची मदत घेतली जात आहे. लम्पीचा प्रभाव असलेल्या गावापासून पाच किलोमीटर अंतराच्या परिसरातील सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. परिसरातील जनावरांच्या लसीकरणासाठी पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागास आतापर्यंत 54 हजार लस उपलब्ध झाली आहे. आणखीही लस उपलब्ध होणार असून, लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे.
वाळकी, मठपिंप्री, रुई छत्तीशी, गुंडेगाव, राळेगण म्हसोबा या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी निर्मला धनवडे, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, माजी सभापती रवींद्र भापकर, दीपक गोरे, युवासेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे, उपसरपंच संतोष भापकर, ग्राविकास अधिकारी अशोक जगदाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल गडाख, क्षीरसागर, विस्तार अधिकारी माळी आदींनी शेतकर्यांच्या गोठ्यावर जाऊन लम्पीबाबत मार्गदर्शन केले. जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे जाणवल्यास तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन विभागासला माहिती द्यावी, असे आवाहन शेतकर्यांना केले आहे.
'संक्रमित जनावरे वेगळी ठेवा'
गोचिड, गोमाशा, डासांपासून लम्पी आजाराचे संक्रमण होत आहे. त्यामुळे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. गोठ्यात पाणी, गोमूत्र, शेणाचा साठा होऊ देऊ नये. जनावरांमध्ये लक्षणे जाणवल्यास त्या जनावरांची दुसर्या जागेवर व्यवस्था करावी. गोठ्यात व परिसरात फवारणी करून लम्पी आजाराला थोपवता येऊ शकते, असे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
तालुक्यातील अकरा गावातील 19 जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आढला आहे. त्यातील सान जनावरे बरी झाली आहेत. अरणगावमध्ये बाधित एक नावर पूर्णपणे बरे झाले. तालुक्याला 54 हजार लस मिळाली असून, आणखी लस उपलब्ध होणार आहे. लसीकरणाचा वेग वाढविला आहे. लसीकरणासाठी मनुष्यबळ कमी पडतेय; मात्र खासगी पशुवैदकीय मदतीसाठी कामी येत आहेत. यामुळे लसीकरणास मदत होत आहे.
-निर्मला धनवडे, पशुसंवर्धन अधिकारी, नगर