व्यंगावर थट्टा करणे क्रुरताच; दिव्यांग नवऱ्याला घटस्फोटाचा हक्क : पंजाब, हरियाणा उच्च न्यायालय | पुढारी

व्यंगावर थट्टा करणे क्रुरताच; दिव्यांग नवऱ्याला घटस्फोटाचा हक्क : पंजाब, हरियाणा उच्च न्यायालय

पुढारी ऑनलाईन डेस्क – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने शारीरिक व्यंगावर थट्टा करणे ही क्रुरता आहे, असा निर्वाळा देत पोलिओग्रस्त नवऱ्याचा घटस्फोटासाठीचा दावा मान्य केला आहे. मानसिक आणि शारीरिक छळ या दोन बाबी विचारात घेत न्यायलयाने हा निर्णय दिला आहे. हा खटला तब्बल दोन दशके सुरू होता. न्यायमूर्ती रितू भारी आणि निधी गुप्ता यांनी हा निकाल दिला. (Taunting person for handicap most inhumane kind of cruelty)

या प्रकरणातील जोडप्याचं लग्न २००४ला झाले होते. पण लग्नानंतर एका महिन्यानंतर बायकोचे यापूर्वी लग्न झाले होते आणि तिला एक मुलगा आहे, हे लपवले गेले होते, असे पतीच्या लक्षात आले. तसेच पतीने दावा केला होता की बायको त्याचा शारीरिक व्यंगावरून छळ करते आणि एका घटनेत तसेच नातेवाईक आणि मित्रांसमोर धक्का देऊन जमिनीवर पाडले होते.

कौटुंबिक न्यायालयाने नवऱ्याने दाखल केलेला घटस्फोटा अर्ज फेटाळून लावला होता. बायकोने नेमकी कोणत्या दिवशी आणि कोणत्या ठिकाणी धक्काबुक्की केली आणि व्यंगावर थट्टा केली, याची माहिती नवऱ्याने दिलेली नाही, असे कौटुंबिक न्यायालयाने म्हटले होते.
पण उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने इतर पुरावे दुलर्क्षित केले, असे मत व्यक्त केले. इतर पुराव्यांत साक्षीदारांनी नवऱ्याच्या बाजूने दिलेल्या साक्षींचा समावेश होता. “बायको दिव्यांग नवऱ्याला वाईट वागणूक देत होती, हे सिद्ध करण्यासाठी पुरेशे पुरावे आहेत,” असे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी म्हटले आहे.

तसेच नवरा बायको दोघेही २००५पासून स्वतंत्र राहात असल्याने त्यांचे कुटुंब मोडलेलेच आहे, आता जे लग्न दिसते ते फक्त कागदावरच अस्तित्वात आहे, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले. असे जरी असले तरी नवऱ्याने बायकोला एक वेळची पोटगी म्हणून १५ लाख आणि मुलाला १० लाख रुपये द्यावेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Back to top button