बेळगाव : घटस्फोट प्रलंबित असतानाच पत्नीचा खून | पुढारी

बेळगाव : घटस्फोट प्रलंबित असतानाच पत्नीचा खून

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  पत्नीचा चाकूने भोसकून खून केल्याची सौंदत्ती शहरात गुरुवारी सकाळी घडली. शबाना महबूबसाब गोरवनकोळ्ळ (वय 28, माहेर खानापूर, सध्या रा. साईनगर, सौंदत्ती) असे मृत महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचा पती महबूबसाब गरीबसाब गोरवनकोळ्ळ (वय 30, रा. मुनवळ्ळी, ता. सौंदत्ती) याला अटक केली आहे. आपल्याशी काडीमोड घेऊन दुसर्‍याशी विवाह करत असल्याच्या रागातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

महबूबसाब व शबाना यांचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून त्यांना दोन मुले आहेत. हे दांपत्य आधी मुनवळ्ळी येथे राहात होते. परंतु, पती-पत्नीमध्ये खटके उडू लागल्याने पत्नी त्याला सोडून एका मुलीसह सौंदत्ती येथे भाडोत्री घरात राहायला गेली होती. यानंतर तिने पतीविरोधात न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नी दुसर्‍याशी लग्न करणार असल्याची कुणकुण महबूबसाबला होती. गुरुवारी सकाळी ती राहत असलेले ठिकाण गाठून महबूबसाबने तिच्यावर चाकूने वार केला. अनेक वार केल्याने ते वर्मी बसल्याने ती जागीच ठार झाली. सौंदत्ती पोलिसांनी महबूबसाब याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button