Crypto Adoption Index 2022 | भारतात क्रिप्टोकरन्सी स्वीकारार्हतेत वाढ, जगात चौथ्या स्थानी, पहा चीन कितव्या स्थानी | पुढारी

Crypto Adoption Index 2022 | भारतात क्रिप्टोकरन्सी स्वीकारार्हतेत वाढ, जगात चौथ्या स्थानी, पहा चीन कितव्या स्थानी

पुढारी डेस्क : सिंगापूर येथील चेनॅलिसिस २०२२ (Chainalysis 2022) ने क्रिप्टो मार्केटबद्दल ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स (Crypto Adoption Index 2022) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात असे दिसून आले आहे की, सलग दुसऱ्या वर्षी क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यामध्ये व्हिएतनाम १.००० च्या एकूण इंडेक्स रँकिंगसह प्रथम क्रमांकावर आहे. तर भारतातही क्रिप्टोकरन्सीची स्वीकारार्हता वाढली असून या यादीत भारत ०.६६३ च्या इंडेक्स स्कोअरसह चौथ्या स्थानावर आहे.

विशेष म्हणजे या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की जगभरात क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्याचा वेग मंदावला आहे. पण तो प्री-बुल मार्केट पातळीच्या वर राहिला आहे. “डेटा असे दर्शवितो की २०१९ च्या मध्यापासून सातत्याने वाढ झाल्यानंतर गेल्या वर्षी क्रिप्टो अॅडॉप्शन पातळी कमी झाली आहे,” असे चेनॅलिसिसने त्यांच्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
इतर देशांची स्थिती कशी आहे?

अमेरिकेतील क्रिप्टोकरन्सींमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. तरीही अमेरिका ग्लोबल क्रिप्टो अॅडॉप्शन इंडेक्स क्रमवारीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. तो २०२१ मध्ये आठव्या आणि २०२० मध्ये सहाव्या स्थानावर होता. हे आश्चर्यकारक नाही, कारण आमचे संशोधन असे दर्शविते की कमी क्रयशक्ती (low purchasing power) असलेल्या देशांमध्ये P2P एक्सचेंजचा वापर सर्वाधिक असतो. कदाचित सर्वात महत्वाचे तथ्य हे आहे की अमेरिका हा आमच्या निर्देशांकावर आतापर्यंत सर्वोच्च क्रमांकाचा विकसित बाजार असलेला देश आहे आणि UK सोबत अव्वल २० मध्ये स्थान मिळवणारा केवळ दोनपैकी तो एक आहे,” असेही अहवालात म्हटले आहे.

२०२१ मध्ये १३ व्या स्थानावर राहिलेल्या चीनने या वर्षी चेनॅलिसिस निर्देशांकाच्या पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. या अहवालातील उप-निर्देशांक दर्शवितो की केंद्रीकृत सेवांच्या (centralised services) वापरामध्ये चीन विशेषतः मजबूत आहे. एकूणच आणि किरकोळ अशी दोन्ही स्तरांवरील व्यवहारातील क्रयशक्तीमध्ये चीन दुसऱ्या स्थानी आहे.

चीन सरकार क्रिप्टोकरन्सी व्यवहार मोडीत काढण्याची कारवाई करत आहे. चीनने सप्टेंबर २०२१ मध्ये सर्व क्रिप्टोकरन्सी व्यवहारावर बंदी घातली होती. “पण आमचा डेटा असे सूचित करतो की ही बंदी प्रभावीपणे लागू करण्यात आलेली नाही,” असे अहवालात म्हटले आहे.
याशिवाय अहवालात असे दिसून आले आहे की कमी-मध्यम आणि उच्च-मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांतील यूजर्स रेमिटन्स पाठवण्यासाठी फियाट चलनाच्या (fiat currency) अस्थिरतेच्या वेळी त्यांची बचत टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी विशिष्ट असलेल्या इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रिप्टोकरन्सींवर अवलंबून असतात.

“हे देशदेखील इतर देशांच्या तुलनेत बिटकॉइन आणि स्टेबलकॉइन्सवर अधिक अवलंबून आहेत.. येत्या काही वर्षांत उच्च आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी स्वीकारार्हता वाढवण्यासाठी क्रिप्टोकरन्सी इंडस्ट्री कोणते उपाय करू शकतो हे पाहणे महत्वाचे असेल.” असे अहवालात नमूद केले आहे. (Crypto Adoption Index 2022)

हे ही वाचा :

Back to top button