

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरमधील (J&K) श्रीनगर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. श्रीनगर, नौगाम, डांगेरपोरा भागात पोलिस आणि सुरक्षा जवानांनी संयुक्त शोधमोहीम सुरु केली होती. या शोधमोहिमेदरम्यान दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. घटनास्थळी त्यांचे मृतदेह मिळाले आहेत.
बडगाममधील शाहिद अह गनई आणि करीमाबाद, पुलवामा येथील अर्जुमंद (एजाज) रसूल नजर अशी २ दहशतवाद्यांची नावे आहेत. दोन्ही दहशतवाद्यांचा वुग्रागुंड, पुलवामा येथे नुकत्याच झालेल्या एका मजुराच्या हत्येत सहभाग होता, अशी माहिती श्रीनगरमधील संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यानी दिली.
पोलिसांनी सांगितले की, J&K च्या नौगाममधील डांगेरपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. चकमकीच्या ठिकाणाहून एक एके-सिरीज रायफल, दोन पिस्तूल आणि एक ग्रेनेडसह काही साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
"शोध मोहिमेदरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त शोध दलावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला पोलीस आणि जवानांनी चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला," असे पोलिसांनी सांगितले. "पोलिसांच्या नोंदीनुसार, मारले गेलेले दोन्ही दहशतवादी बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित आहेत. दोघा दहशतवाद्यांचा पोलिस तसेच सुरक्षा दलांवर हल्ले आणि नागरिकांवर अत्याचारांसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सहभाग होता. याशिवाय, पुलवामाच्या उगरगुंड नेवा भागात २ सप्टेंबर रोजी पश्चिम बंगालच्या मुनीर-उल-इस्लाम नावाच्या मजुरावर झालेल्या हल्ल्यातही ते सामील होते."
हे ही वाचा :