उत्तर प्रदेश : चक्क पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाशी 'अफेअर'वरून गोळीबार, पाचजण निलंबित | पुढारी

उत्तर प्रदेश : चक्क पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाशी 'अफेअर'वरून गोळीबार, पाचजण निलंबित

बरेली (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील बरेलीमधील बहेडी पोलिस ठाण्यातील गोळीबाराचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. येथे दोन कॉन्स्टेबल एकमेकांना भिडले. कारण होते एका महिला सहकाऱ्यासोबत असलेल्या अफेअरचे. मोनू कुमार या कॉन्स्टेबलने सर्व्हिस रिव्हॉल्व्हर उचलून पोलिस स्टेशनच्या आत गोळीबार केला. सुदैवाने बदुंकीतील गोळी कोणाला लागली नाही. त्याने केवळ रागाच्या भरात गोळीबार केला, असे एका पोलिसाने सांगितले. दरम्यान, हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांसह पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी बेशिस्त वर्तनाबद्दल ही कारवाई केली आहे. या प्रकरणी खात्यातर्गंत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

ज्यावेळी पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार झाला त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. ज्याने हा गोळीबार केला तो नंतर तेथून गायब झाला. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, बहेडी पोलिस ठाण्यात मोनू कुमार आणि योगेश या पोलिस कॉन्स्टेबलमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. दोघांमधील वादाचे कारण एक महिला कर्मचारी होती. सोमवारी रात्री दोघांमध्ये या कारणावरुनच वाद झाला. या वादात मोनूने रिव्हॉल्वरमधून गोळीबार केला. पोलिस ठाण्यात गोळीबार झाल्याने गोंधळ उडाला.

मोनू कुमार आणि महिला कॉन्स्टेबल एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत होते. बहेडी स्टेशनवर त्यांची नियुक्ती होण्याआधीपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. कॉन्स्टेबल योगेशने त्यांच्या नात्याबद्दल खोडसाळ कमेंट केली होती. घटनेच्या दोन दिवस आधी कुमार आणि योगेश यांच्यात जोरदार वाद झाला होता. पण इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यातील वाद मिटवला होता. मोनू महिला कर्मचाऱ्याच्या घरी गेला असताना तेथे योगेश आणि मनोज हे पोलिस कॉन्स्टेबल पोहोचले. त्यांनी त्या दोघांचा व्हिडिओ बनवला. यामुळे महिला कर्मचाऱ्याच्या घरी मोनू आणि योगेश यांच्यात हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिस ठाण्यातही त्यांच्यात हा वाद सुरु होता. त्यानंतर हे प्रकरण गोळीबारापर्यंत पोहोचले.

 हे ही वाचा :

Back to top button