Magsaysay award : केरळच्या माजी आरोग्य मंत्र्यांनी का नाकारला रॅमन मॅगसेसे पुरस्कार? जाणून घ्या कारण | पुढारी

Magsaysay award : केरळच्या माजी आरोग्य मंत्र्यांनी का नाकारला रॅमन मॅगसेसे पुरस्कार? जाणून घ्या कारण

थिरुअनंतपुरम : पुढारी ऑनलाईन; आशिया खंडातील नोबेल पुरस्‍कार अशी रॅमन मॅगसेसे पुरस्‍काराची ओळख आहे. हा पुरस्कार कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडियाच्‍या (मार्क्सवादी) नेत्‍या व केरळच्‍या माजी मंत्री के.के. शैलजा यांनी नाकारला आहे. ( Magsaysay award ) कोरोना काळात त्‍यांनी केलेल्‍या उल्‍लेखनीय कार्याबद्‍दल त्‍यांचा मॅगसेसे पुरस्‍काराने सन्‍मान करण्‍यात येणार होता.जाणून घेवूया त्‍यांनी हा पुरस्कार का नाकारला? यामागील कारण.

पुरस्‍कार वैयक्तिक क्षमतेनुसार घेण्यास स्वारस्य नाही : शैलजा

शैलजा यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले की, मला हा पुरस्‍कार वैयक्तिक क्षमतेनुसार घेण्यास स्वारस्य नाही. त्‍यामुळे मी हा पुरस्‍कार नाकारला आहे. मात्र सीपीआय (एम) पक्षाच्‍या दबावामुळे शैलजा यांनी मोठ्या पुरस्‍कारापासून वंचित राहावे लागले, अशी चर्चा केरळच्‍या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Magsaysay award : मॅगसेसे  कट्टर कम्युनिस्ट विरोधक : येचुरी

सीपीआय (एम) पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी स्‍पष्‍ट केले की, “हा पुरस्‍कार रॅमन मॅगसेसे यांच्‍या नावाने देण्यात येतो. मॅगसेसे हे कट्टर कम्युनिस्ट विरोधक होते. त्‍यांचा फिलीपिन्‍समधील कम्‍युनिस्‍ट विरोधी कारवायांचा क्रूर इतिहास सर्वांना माहित आहे. त्‍यामुळे सीपीआय(एम) च्या केंद्रीय समिती सदस्या श्रीमती शैलजा यांनी पक्षातील वरिष्‍ठ नेत्‍यांशी चर्चा केली. यानंतर त्‍यांनी हा पुरस्‍कार स्‍वीकारणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.”

केरळमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या समस्या ज्या पद्धतीने हाताळल्या गेल्या त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात आहे. हा केरळमधील एलडीएफ सरकार आणि आरोग्य विभागाचा एकत्रित प्रयत्न आहे. हा कोणताही वैयक्तिक प्रयत्न नाही, असेही येचुरी यांनी सांगितले.

मार्च 1957 मॅगसेसे यांचे विमान अपघातात मृत्‍यू झाला होता. यावर्षापासून रॉकफेलर ब्रदर्स फंडने दिवंगत राष्ट्राध्यक्षांना सन्मानित करण्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्‍यास सुरुवात केली होती. फिलीपिन्स आणि इतर आशियाई देशांतील सरकारी सेवा, सार्वजनिक सेवा, आंतरराष्ट्रीय समाज, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराने गौरविण्‍यात येते.

हेही वाचा : 

 

 

Back to top button