

पुढारी वृत्तसेवा – नवी दिल्ली : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याच्या हवाला प्रकरणाच्या अनुषंगाने सक्तवसुली संचलनालयाने अभिनेत्री नोरा फतेही हिची तब्बल सात तास चौकशी केली आहे. फसवणूक आणि हवाला प्रकरणात नोरा साक्षीदार बनलेली आहे. या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला आरोपी बनविण्यात आले असून अलिकडेच ईडीने तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
इतर आरोपींना साक्षीदार बनविले जात असताना केवळ आपल्याला बळीचा बकरा बनविले जात असल्याचा आरोप जॅकलीनने केला होता. त्यानंतर आता तपास संस्थेकडून नोरा फतेहीच्या भूमिकेची नव्याने चौकशी केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरची काही दिवसांपूर्वी चौकशी करण्यात आली होती. एका चॅरिटी कार्यक्रमासाठी आपणास बोलाविण्यात आले होते.
त्यावेळी चंद्रशेखरची पत्नी लीना पॉलोज हिने गुच्ची कंपनीची बॅग तसेच आयफोन भेटी दाखल दिले होते, असे नोराने ईडीच्या मागील चौकशी वेळी सांगितले होते. सुकेशकडून तुला लवकरच नवीन बीएएमडब्ल्यू कार भेटीदाखल दिली जाईल, असे आश्वासनही लीनाने दिले होते, अशी कबुली नोराने दिली होती.