

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : घरगुती गॅस ४१० वरुन ८८५ रुपयांवर : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच विना अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ केली आहे.
ताज्या दरवाढीनंतर दिल्ली तसेच मुंबईमध्ये 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 884.50 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे चेन्नई, कोलकाता आदी शहरांमध्ये सिलेंडर दराने 900 रुपयांचा आकडा ओलांडला आहे. 1 जानेवारीपासून गॅस सिलेंडर दरात आतापर्यंत 190 रुपयांची वाढ झाली आहे.
तेल कंपन्यांकडून 1 जुलैपासून सिलेंडर दरात 75.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जुलैमध्ये ही वाढ 25.50 रुपयांची तर ऑगस्टमध्ये 25 रुपयांची होती. आता 1 सप्टेंबर रोजी पुन्हा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कोलकाता येथे सिलेंडरचे दर 911 रुपयांवर तर तामिळनाडूतील चेन्नईमध्ये हेच दर 900.50 रुपयांवर पोहोचले आहेत.
प्रत्येक महिन्यात दरवाढ करून गॅस सिलेंडरवरील सबसिडी समाप्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे.
घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती गेल्या सात वर्षात दुपटीने वाढल्या आहेत. 1 मार्च 2014 रोजी गॅस सिलेंडरची किंमत 410.5 रुपये इतकी होती.
दरम्यान तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 75 रुपयांची वाढ केली आहे. दर महिन्याच्या 1 आणि 15 तारखेला जागतिक बाजारपेठेतील दरांचा आढावा घेऊन गॅस सिलेंडर दरात वाढ किंवा घट केली जाते.
नागरिकांना एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी गॅस वितरकांकडे जावे लागते. पण यापुढे कनेक्शन घेण्यासाठी एक मिसकॉल पुरेसा असल्याचे इंडियन ऑईलकडून सांगण्यात आले आहे. फक्त इंडियन ऑईलमध्येच ही सुविधा मिळणार आहे.
हे ही वाचलं का?