

धारूर (बीड); पुढारी ऑनलाईन: धारूर शहरात एका सोनोग्राफी सेंटरमध्ये नेऊन महिलेशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंग व जातिवाचक शब्द वापरल्याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, डॉ. हजारी यांच्याविरोधात दाखल केलेला गुन्हा खोटा असून तो तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी सकाळी धारूर बंदचे आवाहन करण्यात आले.
नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांचा धारूर शहरात 'हजारी हॉस्पिटल' नावाचा दवाखाना आहे. मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास १९ वर्षीय गर्भवती महिला उपचारासाठी दवाखान्यात आली. तिचे सोनोग्राफी करण्यासाठी एका रूममध्ये बोलावण्यात आले. यावेळी सोनोग्राफी दरम्यान डॉ. हजारी यांनी तिच्याशी अश्लील चाळे करत जातिवाचक शब्द वापरले.
हा प्रकार महिलेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून डॉ. हजारी यांच्याविरोधात विनयभंग व ॲट्रॅसिटी ॲक्टनुसार धारूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे.तपास केज येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगाटे करीत आहेत.
डॉ. हजारी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले आराेप खोटा असून गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी (दि.१) रोजी सकाळी धारूर बंदचे आवाहन करण्यात आले. यानंतर व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. शहरात यावेळी फेरी काढण्यात येवून तहासीलदार आणि पोलीसांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी संघ, नागरिक सहभागी झाले होते.
या प्रकरणी कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता दबावापोटी खोटा गुन्हा दाखल झाला आहे. याचा निषेध म्हणून आम्ही सर्व खासगी दवाखाने बंद ठेवत आहेत. खोटा गुन्हा तात्काळ रद्द करा व बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असे निवेदन डॉक्टर असोसिएशनने धारूर तहसील कार्यालयात दिले.
–
हेही वाचलंत का?