काँग्रेसला मोठा धक्का! गुलाब नबी आझाद यांचा पक्षातील सर्व पदांसह सदस्यत्वाचाही राजीनामा | पुढारी

काँग्रेसला मोठा धक्का! गुलाब नबी आझाद यांचा पक्षातील सर्व पदांसह सदस्यत्वाचाही राजीनामा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यांनी काँग्रेस पक्षातील सर्व पदांसह सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. आझाद यांनी त्यांच्या नियुक्तीच्या काही दिवसांतच प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा आणि जम्मू आणि काश्मीर काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीच्या राजीनामा दिला आहे. आझाद यांच्या राजीनाम्याने पक्षातील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्या करताना त्यांचा सल्ला घेण्यात आला होता आणि ते पक्षात सक्रिय होते.

आझाद यांचा काँग्रेसच्या ‘जी-२३’ या गटात समावेश होता. या गटातील २३ असंतुष्ट नेत्यांनी दोन वर्षापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्ष नेतृत्व व संघटनेतील बदलाची मागणी केली होती. गुलाम नबी आझाद गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्ष श्रेष्ठीवर नाराज होते. आझाद यांना राजीनामा देण्यासोबतच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एक पत्र लिहिले आहे. त्यांचे हे पत्र ५ पानांचे आहे. आझाद यांनी पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत वरिष्ठ नेत्यांना बाजूला केले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या दोन टीम सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. राहुल गांधी सतत पक्षाच्या घटनेचा अवमान करण्याचे काम करत आहेत.

हल्लीच हिमाचल प्रदेशात काँग्रेसला धक्का बसला होता. ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी पक्षाच्या निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता गुलाब नबी आझाद यांच्या राजीनाम्याने काॅंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

Back to top button