उत्तर प्रदेश : २०० रुपयांची फाटकी नोट घेतली नाही, पिझ्झा डिलिव्हरी बॉयवर गोळ्या झाडल्या | पुढारी

उत्तर प्रदेश : २०० रुपयांची फाटकी नोट घेतली नाही, पिझ्झा डिलिव्हरी बॉयवर गोळ्या झाडल्या

बरेली (उत्तर प्रदेश); पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २०० रुपयांची फाटलेली नोट स्वीकारण्यास नकार दिल्याने दोघांनी एका २१ वर्षीय पिझ्झा डिलिव्हरी कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडल्या. सचिन कश्यप असे पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याला जखमी अवस्थेत पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तेथून त्याला बरेली येथील विशेष वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी संशयित २७ वर्षीय नदीम खान आणि त्याचा भाऊ २९ वर्षीय नईम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. कश्यप हा पिझ्झा आउटलेटवर काम करतो. तो पिझ्झा डिलिव्हरीच्या माध्यमातून दररोज ३००-५०० रुपये कमवतो. बुधवारी रात्री ११ वाजता आउटलेट बंद होत असताना संशयित नदीमने फोनवरून पिझ्झा ऑर्डर केला होता. रात्री ११.३० च्या सुमारास सचिन आणि त्याचा सहकारी ऋतिक कुमार यांनी फूड डिलिव्हरी दिली आणि ते जलालनगर परिसरातून पैसे घेऊन निघून गेले. पुढे ते एका दुकानात सॉफ्टड्रिंक विकत घेण्यासाठी गेले. तेथे त्यांनी २०० रुपयांची नोट दिली. मात्र, दुकानदाराने त्यांना सांगितले की नोट फाटलेली आहे आणि ती घेऊ शकत नाही. दोघे लगेच परत फिरले आणि पिझ्झा डिलिव्हरी केलेल्या नदीमचा दरवाजा ठोठावला आणि त्याला फाटलेली नोट बदलून देण्याची विनंती केली. मात्र, नदीमला राग आला आणि त्याने शिवीगाळ केली. काही वेळातच तेथे त्याचा भाऊ बाहेर आला आणि त्याने सचिनवर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

गोळीबाराचा आवाज ऐकून शेजाऱ्यानी या घटनेची पोलिसांना दिली आणि जखमी झालेल्या सचिनला रुग्णालयात दाखल केले. सदर बाजार पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी अमित पांडे यांनी सांगितले की, संशयित दोघांना पकडण्यासाठी परिसरात अनेक पथके तैनात करण्यात आली होती. आम्ही त्यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि अनेक गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी संशयितांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ५०४ (हेतूपूर्वक अपमान) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ५/२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

 हे ही वाचा :

Back to top button