पुणे : स्टिरॉईड्सने अस्थिरोगाचा धोका; कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना सहा महिन्यांतच अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस | पुढारी

पुणे : स्टिरॉईड्सने अस्थिरोगाचा धोका; कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना सहा महिन्यांतच अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस

पुणे; पुढारी वृतसेवा: कोविड महामारीने जगभरातील आरोग्यसेवा क्षेत्रासमोर अनेक आव्हाने निर्माण केली आहेत. पहिल्या दोन लाटांमध्ये स्टिरॉईड्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. त्यामुळे कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये पहिल्या सहा महिन्यांमध्येच हाडांशी संबंधित अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार दिसून आला आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुरेसा रक्तपुरवठा न झाल्याने मांडीच्या वरच्या भागातील बॉल-सॉकेट जॉइंटवर परिणाम होतो आणि हाडे कमकुवत होतात. म्हणजे नितंबस्थिवर परिणाम करते. नितंब एव्हीएनमध्ये नितंबस्थिला रक्तपुरवठा खंडित होतो, ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. यामुळे कमकुवतपणा येतो, सूक्ष्म-फ्रॅक्चर होतात आणि दुखापतीची शक्यता वाढते.

कॉर्टिकोस्टिरॉईड्सचा वापर, मद्यपान, मानेला फ्रॅक्चर, रक्त विकार, कॅन्सरसाठी केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी इत्यादी कारणांमुळे एव्हीएनचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते. पेन किलर्स, अ‍ॅण्टी-ऑस्टिओपोरोसिस औषधे व फिजिओथेरपीच्या सहाय्याने यावर मात करता येऊ शकते. गरज भासल्यास शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो, असे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. आनंद जाधव यांनी सांगितले.
पाठदुखी, मांडीचा सांधा किंवा मांडीच्या दुखण्यासह येणार्‍या रुग्णांचे तपशीलवार वैद्यकीय इतिहास आणि पाठीचा कणा, नितंब व गुडघे यांची सखोल वैद्यकीय तपासणी करून संपूर्ण मूल्यांकन करणे आवश्यक आहे. एमआरआय स्कॅनमुळे एव्हीएनचे लवकर निदान करण्यास मदत होते. त्यानुसार उपचार ठरवले जातात, असे जनरल फिजिशियन डॉ. रोहित मुळे यांनी सांगितले.

ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची घनता कमी होते. केमोथेरपी, स्टेरॉईड्स, कौटुंबिक इतिहास, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान करणे अशा समस्यांना आमंत्रण देऊ शकते. बर्‍याचदा कोविड संसर्गामुळे व्हायरल इन्फेक्शन, अस्थिरता आणि उपचारात स्टेरॉईडचा वापर यामुळे हाडे ठिसूळ होऊन अस्थिरोगाची समस्या उद्भवू शकते. बरेचदा, वृद्धांमध्ये ही समस्या कायमस्वरूपी राहते. म्हणून कोरोनातून बरे झाल्यानंतर हाडांचे आरोग्य तपासून पाहण्यासाठी हाडांची खनिज घनता (बीएमडी) चाचणी करून घेणे गरजेचे आहे.
– डॉ. आनंद जाधव, अस्थिरोगतज्ज्ञ

Back to top button