हिमाचल प्रदेश काँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा आनंद शर्मा यांनी दिला राजीनामा! | पुढारी

हिमाचल प्रदेश काँग्रेस सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा आनंद शर्मा यांनी दिला राजीनामा!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी आज हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले की, ते त्यांच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तडजोड करू शकत नाहीत. महत्त्वाच्या बैठकांना आमंत्रित न केल्यामुळे आनंद शर्मा हे काँग्रेसमध्ये दुर्लक्षित आणि एकाकी पडल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आनंद शर्मा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची बातमीही माध्यमांमध्ये आली होती. त्यानंतर ते म्हणाले की, मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांशी गुप्तपणे भेटण्याची गरज नाही. एके काळी गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेले आनंद शर्मा हे पक्षाच्या हायकमांडचे दीर्घकाळ विरोधक बनले होते. सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या पक्षाच्या 23 असंतुष्ट नेत्यांमध्ये शर्मा यांचाही समावेश होता.

हेही वाचा

Back to top button