Team India : आशिया कपसाठी ‘भारतीय प्लेइंग इलेव्हन’चे चित्र स्पष्ट | पुढारी

Team India : आशिया कपसाठी ‘भारतीय प्लेइंग इलेव्हन’चे चित्र स्पष्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात (Team India) मोठा बदल करण्यात आला. पहिल्या सामन्यात १९२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाला विजयापर्यंत नेणारी शिखर धवन आणि शुभमन गिलची जोडी तुटली आणि शुभमनच्या जागी कर्णधार केएल राहुल धवनचा जोडीदार म्हणून मैदानात उतरला. यावरूनच आशिया चषक स्पर्धेतील भारताच्या प्लेइंग इलेव्हनचे चित्र स्पष्ट झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

२७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपमध्ये केएल राहुल टीम इंडियाचा (Team India) एक भाग आहे आणि आता तो रोहित शर्मासोबत ओपनिंग करणार असल्याचे निश्चित झाले आहे. राहुलने फलंदाजीची सुरुवात केल्याने टीम इंडियाचा २४ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि ३७ वर्षीय अनुभवी दिनेश कार्तिक या दोघांपैकी एकालाच प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्याची संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चला तर पाकिस्तानविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते, यावर चर्चा करूया…

आशिया चषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाचे (Team India) टॉप-4 खेळाडू आधीच निश्चित मानले जात आहेत. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, तरच त्यात काही बदल होईल. केएल राहुल आणि रोहित शर्मा सलामीवीर म्हणून मैदानात उतरतील. त्याचबरोबर विराट कोहली नंबर-3 आणि सूर्यकुमार यादवला नंबर-4 वर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हार्दिक पांड्याचा स्फोटक फॉर्म पाहता त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा परिस्थितीत खरी लढत पंत आणि दिनेश कार्तिक यांच्यात आहे.

संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढणार

IPL 2022 पासून दिनेश कार्तिक अप्रतिम फलंदाजी करत आहे. हा खेळाडू शेवटच्या षटकात जलद धावा करण्यात तरबेज झाला आहे. दुसरीकडे, पंतबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्यात अशी ताकद आहे की तो कोणत्याही सामन्याचे फासे एकट्याच्या जिवावर फिरवू शकतो. अशा परिस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची याबाबत प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित यांची चिंता वाढणार हे ठळक झाले आहे.

दोघांचे रेकॉर्ड कसे आहे…

ऋषभ पंतने आतापर्यंत ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने ८८३ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी २३.८६ आहे. या वर्षी पंतने १३ सामने खेळून २६० धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १३५.४१ राहिला आहे.

त्याच वेळी, दिनेश कार्तिकबद्दल बोलायचे तर, त्याने ४७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २८.१४ च्या सरासरीने ५९१ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, यावर्षी कार्तिकला भारताकडून १५ टी-२० सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे आणि त्याने २१.३३ च्या सरासरीने १९२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३३.३३ आहे.

या दोन्ही खेळाडूंना संघात तेव्हाच संधी मिळू शकते जेव्हा भारतीय संघ सामन्यात ४ स्पेशलिस्ट गोलंदाज आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या सह मैदानात उतरेल, पण या रणनितीमुळे संघाची गोलंदाजी कमकुवत होण्याची शक्यता आहे. आशिया चषक स्पर्धेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ स्पेशलिस्ट गोलंदाज आणि हार्दिक पंड्या दिसणार असल्याचे मानले जात आहे.

दोघांमध्ये कोणाचे पारदे जड?

दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांची तुलना केल्यास पंतचा वरचष्मा आहे. तो भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. यासह तो टॉप-५ मध्ये एकमेव डावखुरा फलंदाज आहे. पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत असेल तर हार्दिक सहाव्या क्रमांकावर आणि जडेजा सातव्या क्रमांकावर खेळताना दिसेल. त्याचबरोबर अश्विनच्या रूपाने भारताला आठव्या क्रमांकावर फलंदाजीचा पर्यायही मिळणार आहे. अशा परिस्थितीत फक्त पंतच संघाचा भाग असू शकतो.

पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन…

केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

Back to top button