पती म्हणायचा ‘तू सुंदर दिसत नाहीस’, कोर्ट म्हणाले, ‘पत्नीची इतर स्त्रियांशी तुलना म्हणजे मानसिक क्रूरताच!’ | पुढारी

पती म्हणायचा 'तू सुंदर दिसत नाहीस', कोर्ट म्हणाले, 'पत्नीची इतर स्त्रियांशी तुलना म्हणजे मानसिक क्रूरताच!'

तिरुवनंतपूरम; पुढारी ऑनलाईन : इतर स्त्रियांशी सतत तुलना करणे आणि पतीकडून वारंवार टोमणे मारणे ही मानसिक क्रूरता (mental cruelty) असल्याचे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवले आहे. न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि सीएस सुधा यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, पतीच्या अयोग्य वर्तनामुळे पत्नीने त्याच्यासोबत राहण्याची वाजवी अपेक्षा केली जाऊ शकत नाही, असा निष्कर्ष काढला पाहिजे.

आपल्या अपेक्षेप्रमाणे पत्नी सुंदर दिसत नसल्याने पतीने सतत आणि वारंवार टोमणे मारणे; इतर महिलांशी तिची तुलना करणे ही नक्कीच मानसिक क्रुरता आहे. पतीची ही कृती पत्नी सहन करु शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, जेव्हा दोघांचा संसार दुरूस्तीच्या पलीकडे तुटलेला दिसतो, तो पुन्हा जोडला जाऊ शकत नाही तेव्हा कायद्याने पक्षकार आणि समाजाच्या हितासाठी वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

“सार्वजनिक हित केवळ अशी मागणी करत नाही की वैवाहिक स्थिती जेव्हा शक्य असेल तेव्हा, शक्य तितक्या लांब टिकवून ठेवा. पण जेथे संसार सावरण्याच्या पलीकडे उद्ध्वस्त झाला असेल तेथे सार्वजनिक हित हे सत्य ओळखण्यातच आहे. मानवी जीवनाचा कालावधी कमी असतो आणि उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दुःख होते आणि ते अनिश्चित काळासाठी सहन करु शकत नाही. एका टप्प्यावर थांबावे लागते. कायदा अशा परिस्थितींकडे डोळेझाक करू शकत नाही किंवा त्यातून उद्भवणाऱ्या गरजांना पुरेसा प्रतिसाद देण्यास नकार देऊ शकत नाही, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.

पत्नीने पती सोबतचे वैवाहिक नाते संपुष्टात आणण्याची मागणी करत कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या या माणगीची दखल घेत कौटुंबिक न्यायालयाने वैवाहिक नाते संपुष्टात आणण्यासाठी परवानगी दिली होती. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

पत्नीने असा युक्तिवाद केला की, पतीला तिच्याबद्दल असलेल्या काही शारीरिक तिरस्कारामुळे तिचे वैवाहिक जीवन अपूर्ण राहिले. यामुळे लैंगिक संबंधास जाणूनबुजून नकार दिला. तर पतीने सांगितले की त्याने अनेकवेळा लैंगिक संबंध ठेवले होते. पण पत्नीने वेदना झाल्याची तक्रार केल्यामुळे काही वेळा थांबावे लागले. त्यानंतर एका स्त्रीरोग तज्ञ्जांकडे तपासणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की शस्त्रक्रिया केल्याने अथवा वारंवार संबंध ठेवल्याने लैंगिक समस्या दूर होऊ शकते.

पत्नीने दावा केला की पती हा रागीट स्वभावाचा आहे. त्याला लगेच राग येतो. त्याने अनेकवेळा तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. ही वस्तुस्थिती त्याच्या आईने पाहिली होती. तिने पुढे सांगितले की पती तिला सतत बोलत रहायचा की तू माझ्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. तू सुंदर दिसत नाहीस असे म्हणत तो माझी तुलना नेहमी त्याच्या भावाच्या पत्नींशी आणि इतर स्त्रियांशी करायचा. माझ्या एखाद्या मित्राकडून मला काही मेसेज आल्यास त्याचा माझ्या पतीला जास्त हेवा वाटायचा, असेही पत्नीने न्यायालयापुढे सांगितले.

न्यायालयाने रेकॉर्डवरील उपलब्ध सामग्रीच्या आधारावर कायद्याच्या कलम (x) अंतर्गत पतीची कृती ही क्रूरता असल्याचे निरीक्षण नोंदवले. वरील बाबींची दखल घेत तसेच दोघे अनेक वर्षांपासून विभक्त होते याची दखल घेत न्यायालयाने पतीने अपील फेटाळून लावले. दोघांमधील वैवाहिक नाते दुरुस्ती करण्यापलीकडे गेल्याचे दिसते. दोघांचा विवाह केवळ नावालाच आहे. वैवाहिक नाते दुरुस्तीच्या पलीकडे उद्ध्वस्त झाल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

Back to top button