Mamata Banerjee vs Nehru : ममतादीदींच्या ट्विटर प्रोफाइल फोटोतून ‘नेहरू गायब’! काँग्रेसची जोरदार टीका

Mamata Banerjee vs Nehru : ममतादीदींच्या ट्विटर प्रोफाइल फोटोतून ‘नेहरू गायब’! काँग्रेसची जोरदार टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mamata Banerjee vs Nehru : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ट्विटर प्रोफाइलवरील फोटोवरून वाद सुरू झाला आहे. या फोटोमध्ये त्यांनी स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत क्रांतिकारक आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांची छायाचित्रे समाविष्ट केली आहेत, मात्र त्यात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या छायाचित्राचा समावेश करण्यात आलेला नाही. यावरून काँग्रेसने ममतादीदींवर निशाणा साधला आहे. आतापर्यंत काँग्रेसकडून जवाहरलाल नेहरूंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप भाजपवर होत होता, पण आता ममता बॅनर्जीही भाजपच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहेत. दरम्यान, बंगाल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एक ट्विट करून टीएमसीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

टीमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचे ट्विट रिट्विट करताना काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये मुलीने तयार केलेले स्केच शेअर केले आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माझ्या मुलीने इतिहासाच्या काही मूलभूत गोष्टींची आठवण करून देत स्वातंत्र्यदिनानिमित्त स्केच तयार केले आहे. हा फोटो मी शेअर करत आहे.' (Mamata Banerjee vs Nehru)

अभिषेक बॅनर्जी यांच्या मुलीने पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे स्केच बनवले आहे, ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू देखील दिसत आहेत. हे ट्विट रिट्विट करत काँग्रेसने टीएमसी आणि ममता बॅनर्जी यांना टॅग केले आहे. काँग्रेसने लिहिले, 'या चिमुकलीकडून ममता बॅनर्जी आणि टीएमसीला इतिहासाचा धडा घेणे आवश्यक आहे. कारण या लोकांनी मुद्दाम जवाहरलाल नेहरूंचे चित्र काढून टाकले.

नेहरूंचे छायाचित्र हटवण्याचा वाद कर्नाटकातही सुरू आहे. कर्नाटकच्या बसवराज बोम्मई सरकारने देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र त्या जाहिरातीच्या पोस्टरमधून जवाहरलाल नेहरूंचा फोटो गायब होता. यावर काँग्रेसने हल्लाबोल करत भाजपवर भेदभावाचा आरोप केला. या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते एम. सिद्धरामय्या यांनी सीएम बोम्मई यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. सिद्धरामय्या म्हणाले की, 'जनतेच्या कराच्या पैशातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत जवाहरलाल नेहरूंचा अपमान झालेला आहे. नेहरूंचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी.' (Mamata Banerjee vs Nehru)

आणखी वाचा…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news