

पुढारी ऑनलाईन: आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी झाला. राजभवन संकुलात एका साध्या सोहळ्यात नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार झाला आहे. तेजस्वी यादव यांचे मोठे बंधू आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव यांना पुन्हा एकदा नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. एकूण 31 आमदार आणि एमएलसी यांनी मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी, नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बुधवारी शपथ घेतली होती.
शपथविधी झाल्यापासून अनेक लोक इंटरनेटवर नितीश कुमार यांच्याबद्दल वेगवेगळी माहिती शोधत आहेत. नितीश यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न गुगलवर सर्च केले जात आहेत. उदाहरणार्थ, नितीश कुमार यांची जन्मतारीख काय आहे? नितीश यांचे वय किती आहे? नितीश यांच्या पत्नीचे नाव काय? कुटुंब आणि नितीश कुमार किती शिक्षित आहेत? नितीश कुमार यांची जात कोणती? हेही लोकांना जाणून घ्यायचे आहे. चला जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे तसेच नितीश यांच्या कुटुंबाविषयी सर्व काही.
नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी बिहारमधील बख्तियारपूर येथे झाला. सध्या त्यांचे वय 71 वर्षे आहे. त्यांच्या आईचे नाव परमेश्वरी देवी होते. वडील राम लखन सिंग हे आयुर्वेदिक डॉक्टर होते. कुर्मी जातीतून आलेल्या नितीश यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. बिहार कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर नितीश यांनी इलेक्ट्रिसिटी बोर्डात काम करायला सुरुवात केली. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सामील झाले आणि राजकारणात उतरले.
नितीश कुमार यांचा विवाह 22 फेब्रुवारी 1973 रोजी मंजू कुमारी सिन्हा यांच्याशी झाला होता. मंजू या बिहारमधील सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. मंजू यांनी स्वतः इंजिनीअरिंग केले होते. नितीश कुमार यांच्या पत्नी मंजू यांचे 2007 मध्ये निधन झाले. मंजू आणि नितीश यांचा एकुलता एक मुलगा निशांत कुमार याने बीआयटीमधून इंजिनीअरिंग केले आहे. निशांत हे राजकारणापासून दूर आहेत. आपण कधीही राजकारणात येणार नसल्याचे निशांत यांनी स्वतः सांगितले आहे.
नितीशच्या कुटुंबात आणखी कोण आहे?
नितीश कुमार यांच्या कुटुंबात पाच भावंडे आहेत. नितीश यांचे मोठे भाऊ सतीश कुमार हे शेतकरी आहेत. याशिवाय नितीश यांना उषा देवी, इंदू देवी आणि प्रभा देवी या तीन लहान बहिणी आहेत. सतीश यांच्याप्रमाणे बहिणीही राजकारणापासून दूर आहेत. नितीश यांच्या कुटुंबाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, कारण नितीश यांनी कुटुंबाला राजकीय क्षेत्रापासून नेहमीच दूर ठेवले आहे.
पहिली निवडणूक हरले, आता आठ वेळा मुख्यमंत्री
1. नितीश यांनी 1977 ची बिहार विधानसभेची निवडणूक पहिल्यांदाच लढवली, पण त्यात त्यांचा पराभव झाला. 1985 मध्ये पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. 1987 मध्ये ते लोकदलाचे प्रदेशाध्यक्ष झाले.
2. 1989 मध्ये ते बिहारच्या बाढ़ लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. एप्रिल 1990 ते नोव्हेंबर 1990 पर्यंत ते केंद्रीय कृषी आणि सहकार मंत्री होते. 1991 मध्ये दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले.
3. 1995 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात लढले. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टी सुरू केली. त्यानंतर त्यांच्या पक्षाला निवडणुकीत केवळ सहा जागा जिंकता आल्या.
4. 1996 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आले. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री, भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि कृषी मंत्री होते.
5. 2 ऑगस्ट 1999 रोजी झालेल्या गॅसल ट्रेन दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून नितीश कुमार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. नितीश रेल्वेमंत्री असतानाच तिकिटांच्या तत्काळ बुकिंगची सुविधा सुरू झाली होती.
6. मार्च 2000 मध्ये ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांचा कार्यकाळ केवळ सात दिवसांचाच राहिला. यानंतर ते 2005, 2010, 2013, 2015, 2017, 2020 आणि 2022 मध्ये मुख्यमंत्री झाले.