ढगफुटीमुळे हिमाचल, जम्मूमध्ये चौघांचा मृत्यू | पुढारी

ढगफुटीमुळे हिमाचल, जम्मूमध्ये चौघांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यांमध्ये संततधार पावसामुळे परिस्थिती बिकट झालेली असतानाच गुरुवारी जम्मू-काश्मीर आणि हिमाचलमध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि बिहारमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याच वेळी ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, गोवा आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये गुरुवारी ढगफुटी झाली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. दरड कोसळल्याने आणि दगड पडल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने यापूर्वीच अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे 20 हून अधिक घरांचे नुकसान झाले. हिमाचल प्रदेशात काल रात्रीपासून पावसाने कहर केला आहे. कुल्लूच्या अनी आणि निर्मंद ब्लॉकमध्ये ढगफुटीच्या घटना घडल्या. काल रात्री तीनच्या सुमारास अणीच्या देवाठी पंचायतीत ढगफुटीनंतर खडेड गावातील घरावर मलबा पडला. यामध्ये 60 वर्षीय महिला आणि 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. बागीपुल आणि चनई गड येथील स्वाह येथेही ढगफुटीमुळे आलेल्या पुरात 20 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे अनी आणि निर्मंदचा कुल्लू मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गुरुवारी सकाळी चंबा-भरमौर एनएचजवळही ढगफुटी झाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मध्य प्रदेशात तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्यानुसार भोपाळमध्ये उद्यापर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. झारखंडच्या निर्जन भागात पुढील 5 दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
आहे.

हेही वाचा

Back to top button