कोंढवा : एनआयबीएम येथे विजेचा लपंडाव | पुढारी

कोंढवा : एनआयबीएम येथे विजेचा लपंडाव

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: एनआयबीएम परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. घरात नवीन विद्युत उपकरण घ्यावे की नको, अशी अवस्था या परिसरातील नागरिकांची झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवा, अन्यथा एनआयबीएम येथे रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा नागिरकांच्या वतीने देण्यात आला आहे. कोंढवा खुर्द एनआयबीएम हा परिसर टोलेजंग गगनचुंबी इमारती असलेला भाग. या ठिकाणची वीज गेली, की नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

यामध्ये अबालवृद्ध नागरिकांची ससेहोलपट होते. गेल्या एक महिन्यापासून वेळी-अवेळी वीज जाणे व अचानक वीज येणे, असा दिनक्रम सुरू आहे. यामुळे अनेकांच्या घरातील विद्यूत उपकरणे कायमस्वरूपी बंद पडली आहेत. तर, काहींची जळून गेली आहेत. वीज नसल्यामुळे इमारतींमधील पाण्याच्या टाकीतून लोकांना पाण्याचे वितरण करता येत नाही. लिफ्ट बंद पडल्यामुळे लोकांना वर-खाली करता येत नाही, शिवाय अनेक जण वीज जाण्याने लिफ्टमध्ये अडकून पडत आहेत. परिसरातील त्रासलेल्या नागरिकांनी स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. मात्र त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.

रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा
थोडे दिवस वीजबिल भरण्यास विलंब झाला, तर महावितरणचे कर्मचारी लोकांचे वीज कनेक्शन तोडतात. पण, एमएसईबीच्या हलगर्जीपणामुळे लोकांचे नुकसान होते, त्याचे काय? वृद्ध लोकांना जो मनस्ताप होतो, याचे काय? एनआयबीएम परिसरातील वीज तत्काळ सुरळीत करावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एनआयबीएम रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा माजी नगरसेविका नंदा लोणकर व नारायण लोणकर यांनी एमएसईबीचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.

Back to top button