(Video) श्रावण विशेष : ज्‍योतिर्लिंग औंढा नागनाथ, या प्राचीन मंदिराबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्‍या | पुढारी

(Video) श्रावण विशेष : ज्‍योतिर्लिंग औंढा नागनाथ, या प्राचीन मंदिराबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्‍या

प्रभाकर स्वामी : औंढा नागनाथ :  बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हे उत्कृष्ट हेमाडपंथी शिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवती 20 फूट उंचीचा तट असून, चार प्रवेशद्वार आहेत. मुख्य मंदिर 126 बाय 118 फूट आहे. मंदिराच्या आतील वर्तुळाकार मंडप आठ खांबांनी तोलून धरला आहे. त्याचे छत घुमटाकार असून, अष्टकोनी कलाकुसरीचे आहे. गर्भगृहात सुंदर शिवलिंग ठेवण्यात आले आहे. परधर्मीयांच्या हल्ल्यापासून मंदिरातील मूर्तीला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचू नये किंवा संभाव्य आक्रमणापासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेतली असावी, असा जाणकारांचा अंदाज आहे.

मंदिरात अर्धमंडप, गर्भगृह हे महत्त्‍वाचे असून, मंडपाची लांबी-रूंदी 40 बाय 40 फूट, अंतराळ व गर्भगृहाची व्याप्‍ती 25 बाय 22.60 फूट एवढी आहे. या मंदिरात आठ नक्षीदार स्तंभ आहेत. मंदिरावरील शिल्पात काही लक्षवेधक शिल्पे आहेत. यात शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असून, रावण पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत आहे. भगवान विष्णूंची दशावतारे कोरलेली आहेत. अर्धनारी नटेश्‍वराच्या शिल्पात शंकर-पार्वती आहेत, शिवाय नटराजांना तांडव नृत्य करताना दाखविले आहे. एका शिल्पात एका व्यक्‍तीस तीन तोंड व चार पाय आहेत. यातील कोणतीही एक बाजू झाकली तर एका व्यक्‍तीची पूर्णाकृती बनते. याशिवाय मंदिरावर तिन्ही बाजूस अंदाजे साडेपाच फूट लांब व आठ फूट रूंदीच रूंदीची एक आकर्षक ध्यानिस्थ योग्याची भव्य स्वरूपाची मूर्ती पाहावयास मिळते. तत्कालीन शिल्प कारागिरांनी गाभार्‍यातील दुषित हवा बाहेर काढण्याची सोय केलेली आहे व बांधकामात जेथे जोड आहे त्याठिकाणी लोखंड व शिसे या धातूच्या मिश्रणाचा उपयोग करून बांधकाम मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे आख्यायिका?

औंढा येथे प्राचीन काळी फार मोठे अरण्य होते. या अरण्यात दारूका नावाचा राक्षस वास्तव्य करीत होता. या अरण्यात वास्तव्य करीत असलेल्या नागवंशीय जमातीस, ऋषी-मुनींना तपस्वींना तपश्‍चर्येमध्ये अतिशय त्रास होऊ लागला. त्यामुळे भगवान शंकराने प्रकट होऊन राक्षसाचा वध केला, अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या तिन्ही बाजूने मध्यावर असलेली ब्रम्हा-विष्णू-महेश या तीन देवतांची शिल्पे अत्यंत उत्कृष्ट आहेत. याशिवाय पांडव, भैरव, यती यांचीही चित्रे मंदिराच्या मध्यभागावर कोरलेली आहेत. नागनाथ मंदिर हे संपूर्ण शिल्पकलेने नटलेले होते. परंतू, मोगल काळात औरंगजेबाने मंदिर उद्धवस्त करून शिल्पेही भग्‍न केल्याचे दिसून येते. यात मंदिराच्या खालच्या बाजूस मांडलेले हत्ती, मूर्ती यांचा समावेश आहे. येथील शिल्प निश्‍चितपणे कोणत्या शतकातील आहे, हे सांगता येत नसले तरी वेरूळ येथील प्रसिद्ध कैलास लेण्यांतील शिल्पाशी हे मिळते-जुळते असल्याने दोन्हीचेही शिल्प एकाच शिल्पकाराच्या मार्गदर्शनाखाली झाले असल्याचा अंदाज व्यक्‍त केला जातो.

औंढा मंदिराचे शिल्प हेमाडपंथी

शिल्पकलेचा एक उत्कृष्ट अविष्कार म्हणून 13 मार्च 1973 रोजी हरीहर तीर्थाच्या खोदकामात सापडलेली विष्णू मूर्ती होय. यावरील विष्णूच्या दशावताराचे केलेले चित्रण व विष्णू मूर्तीच्या हाता-पायाच्या नखांची केलेली रचना पाहता मनुष्य आश्‍चर्यचकित होऊन आपल्या पूर्वजांच्या कलाकृतीत अंतर्मुख होतो. अलीकडच्या काळात येथील कणकेश्‍वरी मंदिराजवळ एक शिलालेख सापडला असून यात यादव राजा रामदेवराव यांनी या मंदिरास मदत केल्याचा उल्‍लेख सापडतो. म्हणून या मंदिराचा कालखंड 11 व 12 वे शतक असावा, असा निष्कर्ष काढला जातो. त्याचबरोबर औंढा मंदिराचे शिल्प हेमाडपंथी असल्याने व हेमाडपंथीचा काळ साधारणतः 11 वे 12 वे शतक असा मानला जातो. शिल्पामध्ये पहिल्या टप्प्यात उंच चौथर्‍यावर छोट्या हत्तीचे शिल्प आहे. हत्तीच्या वरच्या टप्प्यात घोड्याची शिल्पे व त्यावर घोडेस्वार दिसतात. घोडेस्वार हे शस्त्रधारी असल्याने त्याकाळी हे सैन्यात असल्याचा पुरावा दिसून येतो. त्यानंतर बरच्या टप्प्यात पायदळाची शिल्पे असून, यात ढालकरी सैनिकांची तर काही तलवारी सैनिकांची शिल्पे आहेत. त्यानंतर वरच्या टप्प्यात स्त्री देवतांची शिल्पे आहेत. देवतांच्या बाजुला स्त्रिया उभ्या राहून आराधना करीत असल्याचे दिसते. यावरच्या टप्यात अनेक पुरूषदेवता असल्याचे दिसते. या टप्प्यात शंकर-विष्णू-पार्वतीचे शिल्प महत्वाचे आहे.

सर्वांत वरच्या टप्प्यात स्त्रीदेवता, पुरूषदेवता, शंकर-पार्वती, भगवान श्रीकृष्ण, नटराज आदी शिल्पे विविधांगी दिसतात. याशिवाय मंदिराच्या तिन्ही प्रवेशद्वारांच्या पायर्‍याच्या बाजूला उजवीकडे व डावीकडे दोन्ही बाजूस भव्य सुंदर एक हत्ती, दोन घोडे व अंबारी हत्ती दर्शविली आहे. औंढा नागनाथाचा, औधे नागनाथ असा उल्‍लेख पद्मपुराणामधील कावेरी खंडातील अर्मदक महात्म्य प्रकरणात आढळतो. औंधेचा अर्थ उलटे असा आहे, म्हणून उलटे नागनाथ मंदिराच्या शिल्पकलेवर आढळतात.

हेही वाचा : 

Back to top button