मराठा आरक्षण : खासदार संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार : राज्यात अत्यंत संवेदनशील असलेल्या मराठा आरक्षण मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींकडून भेटीची वेळ मिळाली असल्याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मा. राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना कळविण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार दि २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाच्या गटनेत्यांना, व अध्यक्षांना पत्र पाठवली आहेत.
तर खासदारकी सोडली असती : खासदार संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणाबाबत मला संसदेत बोलू दिले नसते तर, मी खासदारकी सोडली असती असे सांगत छत्रपती खा. संभाजीराजे यांनी आरक्षणासाठी आपण हा लढा लढत आहोत, हे स्पष्ट केले. त्यांनी नांदेडमध्ये बोलताना हा खुलासा केला होता.
राज्य सरकारने मराठा समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टया मागास आहे. हे अगोदर सिध्द करावे, तर केंद्र सरकारने ५० टक्केची मर्यादा वाढवावी असे त्यांनी म्हटले होते.
नुसते एकमेकाकडे बोट दाखवून भागणार नाही, राज्य व केंद्र सरकारने आप आपली जबाबदारी पार पाडून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.
१५ जुलै रोजी राज्य शासनाने एक अध्यादेश काढला असून २०१४ साली ज्या लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत. त्यांना सेवेत रूजू करून घ्यावे, असे या आदेशात म्हटले आहे. यासाठी जात प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असून आता आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे या लेाकांना नौकरीत रूजू करता येणार नाही, असे अधिकार्यांकडून सांगितले जात आहे. हा सरळ सरळ अन्याय असून हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असे यावेळी छत्रपती खा. संभाजीराजे यांनी म्हटले होते.
हे ही वाचलं का?
