खासदार छत्रपती संभाजीराजे हे आज (दि. १९) औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाचा पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी 'मोर्चे, आंदोलने काढूनही जर प्रश्न सुटत नसेल तर माझ्या सहीत सर्व राजकारण्यांना वेठीस धरा, मराठा आरक्षणासंदर्भात आता कुठलीही घोषणा नको, तर कृती करावी.' अशी जोरदार मागणी केली.
व्यासपीठावर चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, किशोर चव्हाण, प्रदीप सोळुंके, सतीश वेताळ, मनोज गायके, सुनील कोटकर, विजय काकडे, राजेंद्र पवार, सखाराम काळे, आत्माराम शिंदे, गणपत म्हस्के, अजय गंडे, शिवाजी जगताप, योगेश औताडे, बाळू औताडे, रेखा वहाटूळे, सुकन्या भोसले, मनीषा मराठे, सुवर्णा तुपे, सुवर्णा मोहिते, विलास औताडे, ज्ञानेश्वर शेळके आदींची उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, 'मागील भाजपच्या सरकारने आणि आताच्या महाविकास आघाडी सरकारने एससी, एसटी, ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. घटना दुरुस्ती करून आरक्षणाचा अधिकार केंद्र सरकारनेही आता राज्याला दिला आहे.'
'त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात केवळ घोषणा नको, तर कृती करावी. २००७ पासून मी मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर आवाज उठवत आहे. आतापर्यंत संसदेमध्ये मराठा आरक्षणावर बोलले जात नव्हते, परंतु मी आवाज उठवत राहिलो.'
छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले, 'केंद्र सरकारने आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने आता टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे. आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचे आहे.'
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : जपुयात राजर्षी शाहू महाराजांचा पर्यावरणाचा वारसा