

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी नियुक्तीला आव्हान देणारी याचिका शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत तसेच खासदार राजन विचारे यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्षांनी अवैधरित्या तसेच एकतर्फी निर्णय घेत लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद तसेच गटनेते पदावरून हटवण्यात आल्याप्रकरणी दोघांनी ही याचिका दाखल केली आहे.
लोकसभा अध्यक्षांची कारवाई पूर्णत: मनमानी कारभार आहे तसेच शिवसेना राजकीय पक्षासोबतच संसदेत पक्षांचे अधिकृत प्रतिनिधींकडून घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. लोकसभेत शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत तसेच मुख्य प्रतोद म्हणून राजन विचारे यांच्या नियुक्तीसंबंधीची माहिती प्रक्रियेनूसार अध्यक्षांना देण्यात आल्यानंतर देखील अध्यक्षांकडून शिंदे गटातील संबंधित उमेदवाराला मंजूरी दिल्याचे याचिकेतून सांगण्यात आले आहे.
अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती करण्यापूर्वी पक्षाची भूमिका एकूण घ्यावी, अशी विनंती लोकसभा अध्यक्षांकडे करण्यात आली होती. पंरतु, असे असतानाही संबंधित नियुक्ती करतांना लोकसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्षाकडून अथवा याचिकाकर्त्यांकडून कुठलेही स्पष्टीकरण मागितले नाही. लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलेली कारवाई मनमानी तसेच घटनेच्या १०व्या अनुसूची अंतर्गत परिकल्पित योजनेचे सर्रास उल्लंघन असल्याचा युक्तीवाद याचिकेतून करण्यात आला आहे. राजकीय पक्षाला सभागृहात कुठलीही व्यक्ती अथवा प्राधिकरणाला अधिकृत करण्यासाठी राजकीय पक्षाला प्राथमिकता दिली जाते, असा युक्तीवाद देखील घटनेच्या दहाव्या अनसूचीचा दाखला देत करण्यात आला आहे.
हेही वाचा :