पुढारी ऑनलाईन डेस्क : त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 119 धावांनी दारुण पराभव केला. भारताने 39 वर्षांनंतर पहिल्यांदाच विंडीजला वनडे मालिकेत त्यांच्याच घरच्या मैदानावर क्लिन स्विप दिला. पावसाने व्यत्यय आणलेला शेवटचा सामना जिंकून भारताने पाकिस्तानचा मोठा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. टीम इंडियाने एका देशाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या नव्या विक्रमाची नोंद केली आहे. (ODI World Record)
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विंडीजविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना 119 धावांनी जिंकून इतिहास रचला. 1983 पासून, भारताने कॅरेबियन भूमीवर द्विपक्षीय वनडे मालिका खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते कालची मालिका पार पडेपर्यंत भारतीय संघाला विंडीजला त्यांच्याच मैदानावर वनडे मालिकेत क्लीन स्वीप देता आला नव्हता. पण शिखर धवनच्या नेतृत्वाखालील खेळणा-या भारतीय संघाने 39 वर्षांनंतर वनडे मालिकेत विंडीजचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे.
पाकिस्तानने 1996 ते 2021 पासून द्विपक्षीय वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा सलग 11 वेळा पराभव केला आहे. जो एकाच संघाविरुद्ध सलग वनडे मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम होता. तर टीम इंडियाने 2007 पासून विंडीजविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. विजयाची ही घोडदौड यंदाही कायम ठेवत भारताने सलग 12व्यांदा वनडे मालिकेत विंडीजचा पराभव केला. आता कोणत्याही एका संघाविरुद्ध सलग एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाला आहे. (ODI World Record)
भारताचा सलामीवीर शिखर धवन हा वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्लीन स्वीप करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. तर एका कॅलेंडर वर्षात एकाच संघाला दुस-यांदा व्हाईटवॉश देणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे. यापूर्वी झिम्बाब्वे आणि बांगलादेशने हा पराक्रम केला होता. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला होता.
झिम्बाब्वे तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध सलग मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. 1999 ते 2022 पर्यंत, पाकिस्तानने सलग 10 वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने झिम्बाब्वेला 1995 ते 2018 या कालावधीत 9 वनडे मालिकेत पराभवाची धूळ चारली आहे. (ODI World Record)
भारत (विजयी) विरुद्ध वेस्ट इंडिज (2007-22)* – 12 मालिका
पाकिस्तान (विजयी) विरुद्ध झिम्बाब्वे (1996-21) – 11 मालिका
पाकिस्तान (विजयी) विरुद्ध वेस्ट इंडीज (1999–22) – 10 मालिका
दक्षिण आफ्रिका (विजयी) विरुद्ध झिम्बाब्वे (1995-18) – 9वी मालिका