अधीर रंजन चौधरी यांच्या राष्ट्रपतींबद्दलच्या विधानावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ | पुढारी

अधीर रंजन चौधरी यांच्या राष्ट्रपतींबद्दलच्या विधानावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले. या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांना सदनाचे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले.

कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची अलिकडेच ईडीकडून चौकशी झाली होती. यासंदर्भात संसद आवारात पत्रकारांशी बोलताना अधिर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी असा केला होता. चौधरी यांच्या या विधानावरुन सत्ताधारी भाजपने लोकसभेत चौधरी यांच्याबरोबरच कॉंग्रेसला घेरले. सदनातच सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात हमरातुमरी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

राष्ट्रपतींबद्दल अनुद्गार काढणाऱ्या चौधरी यांनी देशातील गरीब आणि आदिवासी लोकांची माफी मागावी, अशी मागणी स्मृती ईराणी यांनी केली. सोनिया गांधी यांच्या निर्देशावरुन राष्ट्रपतींचा अनादर सुरु असल्याने सोनियांनी सुध्दा माफी मागावी, असे ईराणी म्हणाल्या. मुर्मू यांना जेव्हा रालोआकडून राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली होती, तेव्हा कॉंग्रेसने त्यांना बाहुली, अशुभ आणि अमंगल असे संबोधले. आदिवासींच्या उत्थानासाठी काम केलेल्या मुर्मू यांच्याबद्दल असे बोलणे शोभते का, याचे उत्तर सोनिया गांधी यांनी दिले पाहिजे, असे ईराणी यांनी म्हटले आहे.

अध्यक्षांनी कामकाज तहकूब केल्यानंतर सोनिया गांधी सदनाबाहेर जात असताना भाजप सदस्यांनी हातवारे करीत सोनियांच्या विरोधात घोषणाबाजी केली. हे पाहून सोनिया परतल्या. भाजपच्या रमादेवी यांना काय झाले, असे विचारतानाच चौधरी यांनी माफी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले. तेवढ्यात स्मृती ईराणी तेथे पोहोचल्या. मी आपले नाव घेतलेले आहे, त्यामुळे आपली काय मदत करु शकते, असे ईराणी म्हणाल्या. यावर सोनिया गांधी यांनी ‘डोन्ट टॉक टू मी‘ म्हणजे माझ्याशी बोलू नका, असे उद्गार काढले. त्यानंतरही सोनिया आणि ईराणी यांच्यादरम्यान दोन ते तीन मिनिटे हमरातुमरी सुरु होती.

राष्ट्रपतींची माफी मागेन, पण….

दरम्यान राष्ट्रपतींची माफी मागेन पण ढोंगी भाजपवाल्यांची माफी मागणार नाही, असा पवित्रा अधिर रंजन चौधरी यांनी घेतला आहे. तत्पूर्वी बोलण्याच्या ओघात आपली जीभ घसरली होती, अशी सारवासारव त्यांनी केली. भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत, त्यामुळे ते जबरदस्तीने वाद निर्माण करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला. कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी चौधरी यांची बाजू घेत चौधरींचे ते विधान म्हणजे व्याकरणातील चूक असल्याचे सांगितले तर याच पक्षाचे खासदार जयराम रमेश यांनी ईराणी यांच्यावर टीका केली. स्मृती ईराणी यांनी सोनियांसोबत अमर्यादित आणि अपमानास्पद व्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला.

सीतरामन यांची सोनियांवर टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अधिर रंजन चौधरी यांच्यासह कॉंग्रेसला धारेवर धरले. सोनिया गांधी आमच्या एका महिला खासदाराजवळ येउन बोलत होत्या. त्यावेळी स्मृती ईराणी तिकडे गेल्या असता सोनिया गांधी यांनी धमकावले. सदर प्रकरणात चौधरी आणि सोनिया गांधी यांनी माफी मागणे आवश्यक आहे., असे सीतारामन यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button