कारगिल युद्धातील शहिदांना राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली | पुढारी

कारगिल युद्धातील शहिदांना राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांची आदरांजली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा :  कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित इतर मान्यवरांनी या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंगळवारी आदरांजली वाहिली. ‘कारगिल विजय दिवस’ हा आमच्या लष्कराच्या असाधारण पराक्रम, वीरता आणि दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व सैनिकांना मी नमन करते. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्व देशवासीय सदैव ऋणी राहतील, अशा शब्दांत मुर्मू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

1999 साली पाकिस्तानने दगाबाजी करून भारतावर आक्रमण केले होते. पाकचा हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावण्यात आला होता. मात्र या युद्धात असंख्य सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. पाकवरील त्या विजयाची स्मृती म्हणून 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. ‘मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या पराक्रमांची पराकाष्ठा करणाऱ्या सर्व धाडशी भारत पुत्रांना माझे शतशः नमन’ अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कारगिल विजय दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराकडून जम्मू येथील बलिदान स्तंभस्थळी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. पाकिस्तानच्या घुसखोरांनी 1998 च्या हिवाळ्यात भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यांना हाकलून लावण्यासाठी भारताने युद्ध छेडले होते. 8 मे ते 26 जुलै 1999 या कालावधीत हे युद्ध झाले होते.

हेही वाचा : 

 

Back to top button