पुढारी ऑनलाइन डेस्क : द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी 10.13 वाजता देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला उद्देशून पहिले संबोधन केले. मी स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली राष्ट्रपती आहे, त्यामुळे स्वातंत्र्य सेनानींनी केलेल्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण ठेवून त्यांनी त्यांच्या स्वप्नात पाहिलेल्या भारताला साकारण्याची आता आपली जबाबदारी आहे, असे म्हणत कारगील विजय दिवसाच्या शुभेच्छा देऊन मुर्मू यांनी भाषणाला सुरुवात केली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, माझे राष्ट्रपती होण्यामुळे देशातील गरीब जनता ही स्वप्न पाहू शकते आणि स्वप्न सत्यात आणू शकते, असा विश्वास आता जनतेत निर्माण होईल. राष्ट्रपती पद ही मोठी जबाबदारी आहे. येणा-या काळात जलद गतीने काम करत देशाच्या विकासासाठी काम करणार. हे काम करत असताना समाजातील सर्व घटकांचा विकास होईल याकडे लक्ष देणार.
यावेळी महिलांसाठी त्या म्हणाल्या, भारताच्या महिलांना विश्वास देते की या पदावर कार्य करताना मी त्यांच्यासाठी काम करेन. इथून पुढे जनतेचे कल्याण हेच माझे ध्येय असणार आहे. यावेळी भारताबाबत बोलताना त्या म्हणाल्या कोरोना काळात देशवासियांनी कोरोना काळात देशवासियांनी ज्याप्रमाणे संयम दाखवला त्यामुळे संपूर्ण जगाने भारताची ताकद पाहिली. त्याचबरोबर भारताने कोरोनाकाळात जगाला मदत देखील दिली. शांततेसाठी जागतिक पातळीवर भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संपूर्ण जग आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे.
शेवटी डिजिटल क्षेत्र आणि अन्य क्षेत्रातील भारताच्या प्रगतीबाबत बोलत त्यांनी आपण सगळे मिळून भारताला आत्मनिर्भर भारत बनवूया, असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.