फलकबाजी करणाऱ्या काँग्रेसच्‍या चार खासदारांचे लोकसभेतून निलंबन | पुढारी

फलकबाजी करणाऱ्या काँग्रेसच्‍या चार खासदारांचे लोकसभेतून निलंबन

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : वारंवार फलक दाखवून लोकसभेच्या कामकाजात बाधा आणणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पावसाळी अधिवेशनातून निलंबन केले आहे. विरोधी सदस्यांनी केलेल्या राडेबाजीमुळे संसदेचे सोमवारचे कामकाज पूर्णपणे वाया गेले. कामकाज गुंडाळल्यानंतर बिर्ला यांनी गोंधळी खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. निलंबन करण्यात आलेल्या खासदारांमध्ये मणिकम टागोर, रम्या हरिदास, जोतिमणि आणि टी. प्रतापन यांचा समावेश आहे.

  • सातारा : चक्कर आली तरीही चालकाने राखले प्रसंगावधान, बस शेतात घालत सर्व प्रवाशांना ठेवले सुरक्षित

लक दाखवत विरोधकांचा लोकसभेत गदारोळ

विरोधी पक्षांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेचे पहिल्या आठवड्याचे कामकाज वाया गेले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा सोमवारी झाली. द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे लोकसभेत दुपारी दोन वाजता कामकाजाला सुरूवात झाली. यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजीला सुरूवात केली. महागाईच्या मुद्यावर तात्काळ चर्चा घेतली जावी, अशी मागणी विरोधक करीत होते. विरोधी खासदारांनी सदनात फलक घेऊन येऊ नयेत. ते नियमात बसत नाही, असे लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी वारंवार बजावले. मात्र तरीही फलक दाखवित विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिला.गदारोळामुळे अध्यक्षांना कामकाज तहकूब करावे लागले.

सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार : लोकसभा अध्‍यक्ष

दुपारी तीन वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर देखील विरोधकांची राडेबाजी थांबली नाही. अनेक विरोधी खासदार ओम बिर्ला यांच्यासमोर येउन फलक दाखवित होते. यानंतर मात्र बिर्ला संतप्त झाले. फलक घेऊन येणाऱ्या सदस्यांना कामकाजात भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सर्व सदस्यांनी संसदेची पवित्रता कायम ठेवणे आवश्यक आहे. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, असे बिर्ला यांनी सांगितले. दुसरीकडे गोंधळी खासदारांवर अध्यक्षांनी निलंबनाची कारवाई करावी, असे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.

महागाईबरोबरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, खाद्यान्नावर लावण्यात आलेला जीएसटी कर, अग्निपथ योजना आदी मुद्यांवरून विरोधी पक्षांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतली आहे. कामकाज गुंडाळल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या चार गोंधळी खासदारांचे पूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : 

 

Back to top button