सातारा : चक्कर आली तरीही चालकाने राखले प्रसंगावधान, बस शेतात घालत सर्व प्रवाशांना ठेवले सुरक्षित | पुढारी

सातारा : चक्कर आली तरीही चालकाने राखले प्रसंगावधान, बस शेतात घालत सर्व प्रवाशांना ठेवले सुरक्षित

भुईंज : पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळुरू महामार्गावर भुईंजनजीक एसटी बस चालकाला चालत्या बसमध्ये चक्कर आली. चालकाने प्रसंगावधान राखत बस सर्व्हिस रोडवरून उसाच्या शेतात घातली. त्यामुळे मोठा अपघात टळला. सुदैवाने बसमधील ४० प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. सर्वजण सुखरूप आहेत.

स्टेरिंगवर कोसळणार इतक्यात चालकाने …

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून तासगावला चाललेली एसटी बस भुईंज येथे सर्व्हिस रोडवरून बसस्थानकच्या दिशेने जात होती. यावेळी अचानक चालकाला चक्कर येऊन उलटी झाली. तो स्टेरिंगवर कोसळणार इतक्यात त्याने स्वतःला सावरत बस रस्त्याच्या बाजूच्या उसाच्या शेतात घातली. यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी मदतकार्य करत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. बसचालक प्रदीप प्रमोद माताडे (रा. तासगाव, जि. सांगली) यांना उपचारासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

घटनास्थळी बसचे मोबाईलमधून फोटो काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पी एस आय रत्नदीप भांडारे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, बापूराव धायगुडे, राजेश कांबळे यांनी प्रवाशांना बाहेर काढले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button