ठाण्यात स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क | पुढारी

ठाण्यात स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूने डोकं वर काढले असून गेल्या आठवड्यात सलग दोन दिवसांत दोघांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. या दोघांवरही ठाण्यातच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मृत झालेल्यांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश असून या दोन्ही महिला कोपरी परिसरात राहणाऱ्या आहेत.

सलग दोन दिवसांत दोन मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनदेखील सतर्क झाले असून मृत्यू झालेल्याच्या आसपासच्या घरांमध्ये जाऊन तापाचे सर्व्हेक्षण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये ६०० घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून या सर्व्हेक्षणामधून अद्याप कोणाला लक्षणे आढळलेली नाहीत असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाण्यात साथीच्या रोगांनी डोके वर काढायला सुरुवात केली असून यामध्ये स्वाईन फ्लूने दोघांचा बळी घेतला आहे. मृत झालेल्यांमध्ये दोन्ही महिलांचा समावेश असून एकीचे वय ७१ वर्ष आहे तर दुसऱ्या महिलेचे वय ५१ वर्ष आहे. यातील पहिली महिला ही जितो रुग्णालयात १४ जुलै रोजी उपचारांसाठी दाखल झाली. त्यानंतर १९ जुलैला तिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर दुसरी महिला ही १४ जुलैलाच ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल झाली. तिचा मृत्यू १८ जुलैला झाला.

ठाण्यात जुलै महिन्यात २० स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले असून यातील १५ जण उपचार घेऊन त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर ३ रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत. यापैकी २ रुग्ण हे ठाणे हेल्थ केअरमध्ये उपचार घेत असून एक रुग्ण हा ज्युपिटरला दाखल आहे. स्वाईन फ्लू सोबतच डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण देखील वाढले असून ठाण्यात सध्या डेंग्यूचे ८ तर मलेरियाचे १४ रुग्ण अढळले आहेत. मात्र या आजाराने एकाचाही मृत्यू झालेला नसल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

पालिका प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत ६०० लोकांच्या घरात जाऊन तापाचे आणि स्वाईन फ्लू ची लक्षणे आहेत कि नाही याची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अजूनही कोणाला लक्षणे अढळली नसली तरी प्रशासनाकडून योग्य ती सतर्कता बाळगण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हे वाचलंत का ?

 

Back to top button