नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल तसेच हिमाचल प्रदेशमध्ये दर १० लाख लोकसंख्येमागे केल्या जाणाऱ्या कोरोना तपासण्या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याने चिंता व्यक्त केली आहे. मिझोराम, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. हिमाचल प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. या राज्यांना आरटी-पीसीआर चाचण्यांचा घटता कल लक्षात घेता सरासरी दैनंदिन १० लाख लोकसंख्येमागे केल्या जाणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण सुधारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या ९ राज्यांमधील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक पार पडली. कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवणे, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांचा बैठकीतून आढावा घेण्यात आला. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ विनोद पॉल बैठकीत उपस्थित होते.
गेल्या एका महिन्यात या राज्यांमधील रुग्णसंख्येत झालेल्या वाढीबाबत डॉ. व्ही. के. पॉल यांनी चिंता व्यक्त केली. सध्या रुग्णवाढ होत असलेल्या अनेक राज्यांमध्ये देखरेख आणि चाचणीचा वेग सुमार असून लसीकरण सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यांनी कोरोना संसर्गदर जास्त असलेल्या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, सुधारित देखरेख धोरणानुसार देखरेख आणि कोविड लसीकरणाला गती देण्याचे आवाहन यावेळी डॉ. पॉल यांनी केले.
महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, मिझोराम, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्यास पुरेसा वाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात १० टक्क्यांपेक्षा अधिक संसर्गदर असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये काटेकोर लक्ष ठेवण्याचे आवाहन या राज्यांना करण्यात आले आहे.