संसदेत विरोधकांचा गदारोळ कायम, स्मृती ईराणी यांची राहुल गांधींवर जोरदार टीका | पुढारी

संसदेत विरोधकांचा गदारोळ कायम, स्मृती ईराणी यांची राहुल गांधींवर जोरदार टीका

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : वाढती महागाई, खाद्यान्नावर लागू करण्यात आलेला जीएसटी कर आदी मुद्यांवरुन विरोधी पक्षांनी सलग तिसऱ्या दिवशी संसदेच्या उभय सदनात गदारोळ घातला. यामुळे दोन्ही सदनाचे बहुतांश कामकाज वाया गेले. दरम्यान, भाजपच्या नेत्या स्मृती ईराणी यांनी संसदेतील गोंधळाचे राहुल गांधी हेच सूत्रधार असल्याची टीका पत्रकार परिषद घेउन केली आहे.

विरोधी सदस्‍यांनी दाखवले ‘गब्बर सिंगचा पुन्हा हल्ला’ आशयाचे फलक

लोकसभेत सकाळी अकरा वाजता कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. विरोधी सदस्यांकडून यावेळी ‘गब्बर सिंगचा पुन्हा हल्ला’ अशा आशयाचे फलक दाखविले जात होते. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी सदस्यांना आपापल्या आसनावर जाण्याची तसेच फलक न दाखविण्याची वारंवार विनंती केली. मात्र विरोधकांवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळे अध्यक्षांनी कामकाज प्रथम दुपारी दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केले.

राहुल गांधींकडून संसदीय परंपरांचा अपमान : स्‍मृती ईराणी

दरम्यान भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी पत्रकार परिषद घेत संसदेतील गोंधळामागे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हेच असल्याची टीका केली. अमेठीचे खासदार असताना आपल्या मतदारसंघातील एकही प्रश्न न विचारणारे कॉंग्रेसचे नेते वायनाडला गेले. वायनाडचे प्रतिनिधीत्व करताना त्यांची संसदेतली उपस्थिती चाळीस टक्क्यांच्या पेक्षाही कमी राहिली. ज्यांचे पूर्ण जीवन संसदीय परंपरांचा अपमान करण्यात गेले, ते संसदीय कार्यवाही, संसदेतील चर्चा बाधित व्हावी, यासाठी आपले जीवन समर्पित करीत आहेत, अशा शब्दांत ईराणी यांनी राहुल गांधी यांचे वाभाडे काढले.

त्‍यांना संसद कामकाजाच्या उत्पादकतेवर प्रश्न विचारण्याचा त्यांना अधिकार नाही, असे सांगून ईराणी पुढे म्हणाल्या की, “देशाची संसद जनतेच्या आशा—आकांक्षेचे प्रतीक आहे. जनहिताच्या विषयांवर आणि मुद्यांवर चर्चा व्हावी, असे जनतेला वाटते. सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, पण कॉंग्रेस पक्षाला संसदेत कोणत्याही स्वरुपाची चर्चा नको असल्याचे त्यांच्या वर्तनावरुन दिसून आले आहे.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button