

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : अग्निपथ योजनेअंतर्गत लष्कर भरती प्रक्रियेवेळी जात प्रमाणपत्र मागितले जात असल्याच्या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या आरोपांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उत्तर दिले असून, लष्कर भरती प्रक्रियेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही तसेच स्वातंत्र्याच्या आधीपासून जात प्रमाणपत्र मागण्याची आहे पध्दत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत सध्या लष्करात युवकांची भरती सुरु आहे. भरती प्रक्रियेवेळी युवकांकडून जात प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे सांगत आम आदमी पार्टी, संयुक्त जनता दल या पक्षांनी तर भाजपच्या खासदार वरुण गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. तिकडे लष्कराकडूनही जात आणि धर्म प्रमाणपत्र. मागण्याच्या मुद्यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. लष्करात भरती करीत असताना याआधीही जात प्रमाणपत्र मागितले जात असे व आधीच्या पध्दतीनुसार याहीवेळी हे प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे. प्रशिक्षण तसेच तैनातीवेळी शहीद होणाऱ्यांवर सैनिकावर अंतिम संस्कार करण्यासाठी धर्माची माहिती असणे आवश्यक असते, त्यासाठी जात प्रमाणपत्र गरजेचे असल्याचे लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करीत विरोधी पक्ष लष्कराला बदनाम करीत असल्याचा आरोप केला.अग्निपथ योजनेच्या अनुषंगाने जाणूनबुजून वाद निर्माण केला जात असल्याचे सांगत पात्रा पुढे म्हणाले की, लष्कराच्या जातीच्या आधारावर भरती केली जात नाही. रेकॉर्डसाठी जातीचे प्रमाणपत्र मागितले जाते, इतकी साधी बाब विरोधी पक्षांना माहित नसावी काय, असा प्रश्न पडतो. अपप्रचार करुन युवकांची जाती-पातीमध्ये विभाजन करण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसून येत आहे. वर्ष 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली होती. त्यावर उत्तर देताना लष्कराने जात प्रमाणपत्र मागणे ही केवळ एक प्रक्रिया असल्याचे सांगितले होते. अरविंद केजरीवाल हे तेच व्यक्ती आहेत, ज्यांनी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता त्यांचा पक्ष अग्निपथ योजनेवरुन युवकांत असंतोष पसरवू पाहत आहे, असेही ते पात्रा म्हणाले.
हेही वाचा :