Vice President Election : विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा अर्ज दाखल | पुढारी

Vice President Election : विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा अर्ज दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Vice President Election) विरोधी पक्षाच्या संयुक्त उमेदवार मार्गारेट अल्वा यांनी आज (दि.१९) संसद भवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. दरम्यान, जगदीप धनखर यांना एनडीएने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवले आहे.

(Vice President Election) तत्पूर्वी, विरोधी पक्षांनी रविवारी राजस्थानच्या माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदासाठी संयुक्त उमेदवार बनविण्याचा निर्णय घेतला. अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तसेच माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानते. ही निवडणूक कठीण असेल यात शंका नाही, मात्र मी कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही. राजकारणात विजय किंवा पराभव हा मुद्दा नसतो, तर लढा देणे महत्त्वाचे असते.

बऱ्याच वर्षानंतर मार्गारेट अल्वा राजकारणात पुनरागमन करत आहेत. २००८ मध्ये आपल्या मुलाला कर्नाटक विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने त्या नाराज झाल्या होत्या. त्यानंतर त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापासून दूर गेल्या होत्या. काही काळ सक्रिय राजकारणापासून त्यांनी विश्रांती घेतली होती. दरम्यान, अल्वा यांच्याकडे उत्तराखंडच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती. अल्वा पाच वेळा काँग्रेसच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. केंद्रीय मंत्री आणि इतर अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखर यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या ६ ऑगस्टरोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button