नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३,६१५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १३,२६५ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशातील सक्रिय रुग्णसंख्या १ लाख ३१ हजार ४३ वर पोहोचली आहे. तर दैनंदिन कोरोनासंसर्गदर ३.२३ टक्के एवढा आहे.
याआधीच्या दिवशीही देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य घट नोंदवण्यात आली होती. रविवारी दिवसभरात १६ हजार ६७८ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, ४२ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, १४ हजार ६२९ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.५० टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोना संसर्गदर ५.९९ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर ४.१८ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशाात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९९ कोटी ५९ हजार ५३६ कोरोना डोस देण्यात आले आहेत. यातील ३.७४ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ पैकी १० कोटी २५ लाख ६४ हजार ७२० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८६.६८ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील २ लाख ७८ हजार २६६ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे नवे १,१८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात १८,०२७ सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये पुण्यातील ६,५१४, मुंबईतील ३,५५७ आणि ठाण्यातील २,१३७ रुग्णांचा समावेश आहे.