पुणे : ‘परतीच्या वारी’त कोरोना वाढण्याची भीती | पुढारी

पुणे : ‘परतीच्या वारी’त कोरोना वाढण्याची भीती

पुणे : पुढारी वृत्तसेवा

आषाढी एकादशी झाल्यामुळे वारकरी परतत आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभरात रुग्णसंख्या वाढू शकेल. त्यानंतर पुढील तीन-चार आठवड्यांमध्ये पुण्यातील रुग्णसंख्येच्या उतरत्या आलेखाला सुरुवात होऊ शकते, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

मुंबईतील रुग्णसंख्येत 49 टक्के घट झाली असून, पुण्यातील रुग्णसंख्येमध्ये 28 टक्के वाढ दिसत आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. कोरोनाच्या चौथ्या लाटेतील प्रादुर्भाव ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बीए 4 आणि बीए 5 या उपप्रकारांमुळे होताना दिसत आहे. चौथ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती.

साधारण चार आठवडे दोन्ही जिल्ह्यांमधील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत होती. आता मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असून, पुणे जिल्ह्यातील आलेख वाढता आहे.

सध्या राज्यातील रुग्णसंख्या 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. 4 ते 10 जुलै या कालावधीत राज्यातील रुग्णसंख्या 22 हजार 155 इतकी होती. यंदाच्या आठवड्यात रुग्णसंख्या 18 हजारांपर्यंत कमी झाली आहे. 5 जुलै रोजी मुंबईतील रुग्णसंख्या 17 टक्क्यांनी कमी झाली, तर पुण्यातील रुग्णसंख्या 47 टक्क्यांनी, नागपूरमधील

रुग्णसंख्या 44 टक्क्यांनी वाढली होती. यंदाच्या आठवड्यात मुंबईत 49 टक्के घट, तर पुण्यात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

काय आहेत सूचना?

स्थानिक रुग्णवाढीकडे लक्ष द्या. एखाद्या भागात सातत्याने रुग्णवाढ होत असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

स्थानिक परिस्थिती आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊन गरजेनुसार कोरोना चाचण्या वाढवाव्यात.

तीव— ताप आणि गंभीर तीव— श्वसन आजार (सारी) पसरू नये, यावर लक्ष ठेवून उपाययोजना कराव्यात.

सुपर स्प्रेडर नागरिक आणि गर्दीच्या ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांवर लक्ष

दर 15 दिवसांनी जिनोम सिक्वेन्सिंग

राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्ण पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या 80 टक्के रुग्ण या पाच जिल्ह्यांमध्ये, तर 20 टक्के रुग्ण इतर जिल्ह्यांमध्ये आहेत. दर 15 दिवसांनी साधारणपणे 1500 नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे.

Back to top button