

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या 18 तारखेपासून सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 17 तारखेला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालावे, यासाठी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याची परंपरा आहे, त्यानुसार ही बैठक बोलाविण्यात आली आहे.
सर्वपक्षीय बैठकीत सामील होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीस उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. संसदेचे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत म्हणजे सुमारे महिनाभर चालणार आहे. या अधिवेशनात अनेक प्रलंबित विधेयके मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. अधिवेशनात विरोधकांकडून वाढती महागाई, तपास संस्थांचा कथित दुरूपयोग, अग्निपथ योजना आदी मुद्द्यावर सरकारची घेराबंदी केली जाण्याची शक्यता आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळातच राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला राष्ट्रपती पदासाठी मतदान होत असून 6 ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलैला जाहीर होणार आहे तर उपराष्ट्रपती निवडणुकीचा निकाल मतदानाच्या दिवशीच जाहीर केला जाणार आहे. राष्ट्रपती पदासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने द्रौपदी मुर्मु यांना संधी दिली आहे. दुसरीकडे विरोधी आघाडीचे यशवंत सिन्हा रिंगणात आहेत. उपराष्ट्रपती पदासाठी दोन्ही आघाडीकडून अद्याप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :