लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा, मीसा भारती यांनी फोटो केला शेअर | पुढारी

लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा, मीसा भारती यांनी फोटो केला शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लालू प्रसाद पाटणा येथील निवासस्थानी पडले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर सुरूवातीला पारस आणि नंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत त्यांचा  मुलगा आणि मुलगी सोशल मीडियावरून सतत माहिती देत आहेत. त्यांची मुलगी मीसा भारती यांनी आज (दि.८) लालू प्रसाद यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते स्वत: बेडवरून आधाराशिवाय उठून बसत आहेत, असे सांगितले.

मीसा भारती यांनी लालूंचा एक फोटो ट्विट करत म्हटले आहे की, लालूंच्या प्रकृतीबाबत उठणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या प्रकृतीबाबत प्रार्थना करण्याचे आवाहन करताना त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या आशीर्वादाने आणि एम्स रुग्णालयाच्या चांगल्या वैद्यकीय सेवेमुळे लालू प्रसाद यांच्या तब्येतीत बरीच सुधारणा होत आहे. आता लालूप्रसाद बेडवरून उठून बसू शकतात. आधार देऊन उभे राहण्यास सक्षम आहेत. प्रत्येक संकटाशी लढून ते बाहेर पडू शकतात. तुमचे मनोबल आणि तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांची प्रकृती आता बरी आहे. कृपया अफवांवर लक्ष देऊ नका.

तेजस्वी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष आणि माझे वडील लालू प्रसाद यांच्या प्रकृतीत सातत्याने सुधारणा होत आहे. ते सखोल वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत आणि त्यांच्या प्रकृतीत उत्तरोत्तर सुधारणा होत आहे. सर्व हितचिंतक, समर्थक, कार्यकर्ते आणि देशवासीयांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाच वर्षाची शिक्षा, ६० लाखांचा दंड

लालू प्रसाद यादव यांच्यावर बहुचर्चित डोरंडा कोषागारमधून १३९.३५ कोटी रुपये हडपल्याचा आरोप असून या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ६० लाखांपर्यंतचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे त्यांची होटवार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. मात्र, तब्येत बिघडल्याने त्यांना एम्स रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button