Agnipath recruitment scheme : अग्नीवीर बनण्यासाठी हवाई दलाकडे आले साडेसात लाख अर्ज | पुढारी

Agnipath recruitment scheme : अग्नीवीर बनण्यासाठी हवाई दलाकडे आले साडेसात लाख अर्ज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लष्कराच्या अग्निपथ योजनेला (Agnipath recruitment scheme) युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून केवळ हवाई दलाला साडेसात लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. अग्निपथ योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया 24 जून रोजी सुरु झाली होती. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 5 तारखेपर्यंत 7 लाख 49 हजार 899 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली.

केंद्र सरकारने अग्निपथ योजना जाहीर केल्यानंतर देशाच्या विविध भागात या योजनेला मोठा विरोध झाला होता. विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये हिंसक विरोध झाला होता. मोठा विरोध होऊनही अग्नीवीर योजनेला युवकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. नौदलातील अग्नीवीर भरतीसाठी अजून काही कालावधी बाकी आहे तर भूदलाकडून भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath recruitment scheme) युवकांना चार वर्षे लष्करात सेवा करण्याची संधी दिली जाणार आहे. या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या 25 टक्के युवकांना लष्कराच्या नियमित सेवेत घेतले जाणार आहे. 4 वर्षात अग्नीवीरांना एकूण 10.4 लाख रुपये कमाविता येतील. व्याजासह ही रक्कम 11.71 लाख रुपये इतकी होईल. हा सगळा पैसा आयकर मुक्त असेल. अग्नीवीरांना चार वर्षांच्या सेवा काळात दरवर्षी 30 दिवसांची सुट्टीदेखील मिळणार आहे.

Back to top button