नवी दिल्ली : ‘अग्निपथ’ विरोधातील आंदोलनात रेल्वेची झाली एक हजार कोटी रुपयांची संपत्ती खाक | पुढारी

नवी दिल्ली : 'अग्निपथ' विरोधातील आंदोलनात रेल्वेची झाली एक हजार कोटी रुपयांची संपत्ती खाक

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : युवकांना लष्करात भरतीची संधी देणाऱ्या अग्निपथ योजनेला देशभरात मोठा विरोध सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी विशेष करून रेल्वेला आपले लक्ष्य बनविले असून, आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांची संपत्तीचे नुकसान झाली आहे. विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान गेल्या एक दशकात जितके नुकसान झाले नव्हते, त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान एकट्या अग्निपथ विरोधातील आंदोलनामुळे झाले आहे.

बिहार, उत्तर प्रदेश या दोन राज्यात आंदोलनकर्त्यांनी रेल्वेचे अतोनात नुकसान केले आहे. शिवाय तेलंगणमधील सिकंदराबाद रेल्वे स्थानकात त्यांनी मोठी तोडफोड केली होती. रेल्वेगाड्यांना आगी लावण्यात आल्याने जास्त नुकसान झाल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. 18 जून रोजी आंदोलनाचा वणवा अधिक होता आणि एकट्या त्या दिवशी सुमारे सातशे कोटी रुपयांचे रेल्वेचे नुकसान झाले.

गेल्या जानेवारी महिन्यात आरआरबी-एनटीपीसी परिक्षेच्या निकालाला आक्षेप घेत आंदोलन झाले होते. त्यावेळी तसेच शेतकरी आंदोलनावेळी पंजाबमध्ये रेल्वेच्या संपत्तीचे मोठे नुकसान करण्यात आले होते. रेल्वेगाड्या जाळणे, रूळ उखडून टाकणे, रेल्वे स्थानकांचे नुकसान आदी माध्यमातून रेल्वेला हानी पोहोचवली जात आहे.

रेल्वेचा एक डबा बनविण्यासाठी सुमारे 80 लाख रुपयांचा खर्च येतो तर स्लीपर डबा बनविण्यासाठी सव्वा कोटी रुपयांचा खर्च येतो. याशिवाय वातानुकूलित डबा बनविण्यासाठी सव्वा तीन कोटी रुपयांचा खर्च येतो. सर्वात जास्त म्हणजे २० कोटी रुपये इतका  खर्च  रेल्वेचे एक इंजिन बनविण्यासाठी होतो. या हिशेबाने १२ डब्यांची संपूर्ण रेल्वेगाडी तयार करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा तर २४ डब्यांची गाडी बनविण्यासाठी ७० कोटी रुपयांचा खर्च होतो.

हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button