सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट | पुढारी

सोशल मीडियावर नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट

भिवंडी : पुढारी वृत्तसेवा :  मुस्लिम धर्मियांचे प्रेषित यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याने भाजपच्या तत्कालीन राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरून निषेधाचा सूर निघत आहे. भिवंडीसह मुंब्रा, मुंबई, दिल्ली या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे वातावरण निवळत असतानाच शनिवारी रात्री एका युवकाने समाजमाध्यमांवर मत प्रदर्शन करीत नुपूर शर्माच्या वक्तव्याचे समर्थन केले. या घटनेनंतर भिवंडीत ही पोस्ट समाज माध्यमांवर पसरविणार्‍या युवकाचा शोध घेवून त्याला असता रविवारी दुपारी ठाणे रोड येथील वाजा मोहल्ला परिसरातून अटक केली. साद अशफाक अन्सारी असे त्याचे नाव आहे. पोस्ट व्हायरल होताच अनेक मोहल्ल्यांतून मुस्लिम युवक साद अन्सारी यास जाब विचारण्यासाठी त्याच्या घरी पोहचले.  ही वार्ता अनेक भागात समजताच शेकडो युवक या परिसरात रस्त्यावर एकत्रित होऊन त्याच्या कृत्याविरोधात निषेध करण्यास सुरुवात करीत होते.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक भिवंडी शहर पोलीस ठाणे व भोईवाडा पोलीस ठाणे येथील पोलिसांसह मोठा पोलीस फौजफाटा परिसरात तैनात करून युवकास घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे लिखाण समाज माध्यमांवर पसरविल्या प्रकरणी साद अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके यांनी दिली आहे. दरम्यान या घटने नंतर पोलीस प्रशासन व मुस्लिम धर्मगुरू, यांनी शहरातील नागरीकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तर ठाणे रोड या परिसरात सुध्दा चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वक्तव्यावरून हिंसा, ‘बुलडोझर’ अन्याय ‘जमात-ए-इस्लामी हिंद’चे प्रतिपादन

नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा ‘जमात-ए इस्लामी हिंद’ने निषेध केला आहे. संघटनेचे सचिव सय्यद तन्वीर अहमद यांनी रविवारी याबाबत आपले म्हणणे मांडले. नुपूर शर्मा यांनी असे वक्तव्य करायला नको होते. पण त्याला विरोध म्हणून हिंसाचार करणेही वाईटच आहे. हिंसाचार करणार्‍यांविरोधात कारवाई व्हायलाच हवी. पण बुलडोझरने कुणाचे घर जमीनदोस्त करणे मात्र नक्कीच न्याय्य नाही. कारण जेव्हा एखाद्याचे घर मोडते, तेव्हा गुन्ह्यात सहभागी नसलेल्या घरातील अन्य सदस्यांवर तो मोठा अन्याय आहे, असेही सय्यद यांनी स्पष्ट केले.

Back to top button