GST : सरत्या जून महिन्यात १ लाख ४४ हजार ६१६ कोटी रुपयांची जीएसटी करवसुली | पुढारी

GST : सरत्या जून महिन्यात १ लाख ४४ हजार ६१६ कोटी रुपयांची जीएसटी करवसुली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सरत्या जून महिन्यात 1 लाख 44 हजार 616 कोटी रुपयांची जीएसटी करवसुली झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सोशल मीडियाद्वारे दिली. जीएसटी (GST) करप्रणाली लागू झाल्यापासूनची ही दुसरी सर्वाधिक मासिक करवसुली असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये झालेली करवसुली (GST) 56 टक्क्याने जास्त आहे. आगामी काळात मासिक जीएसटी करवसुलीचा आकडा 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या राहील, असा विश्वास सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. मे महिन्यात जीएसटी करवसुलीचा आकडा 1 लाख 40 हजार 885 कोटी रुपये इतका होता. त्या तुलनेत जूनमध्ये ही वसुली वाढून 1 लाख 44 हजार 616 कोटी रुपयांवर गेली आहे. कर चुकवेगिरी करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी सरकारकडून अनेक मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत, यामुळेदेखील करवसुलीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे.

पाच वर्षांआधी जीएसटी करप्रणाली अंमलात आली होती. एप्रिल 2022 मध्ये सर्वाधिक 1 लाख 67 हजार 540 कोटी रुपयांची करवसुली झाली होती. त्यानंतर गत जून महिन्यात झालेली करवसुली सर्वात जास्त आहे. 1 लाख 40 हजार कोटी रुपये करवसुलीचा आकडा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे. जूनमधील ढोबळ करवसुलीचे आकडे पाहिले, तर केंद्रीय जीएसटीच्या माध्यमातून 25 हजार 306 कोटी रुपये, राज्य जीएसटीच्या माध्यमातून 32 हजार 406 कोटी रुपये तर आय-जीएसटीच्या माध्यमातून 75 हजार 887 कोटी रुपये प्राप्त झाले. आय- जीएसटीमध्ये 40 हजार 102 कोटी रुपयांच्या आयात कराचाही समावेश आहे. याशिवाय उपकरांच्या माध्यमातून 11 हजार 18 कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळालेला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button