मतदारांना करा दारु वाटप! छिंदवाड पालिका उमेदवारांना मध्‍य प्रदेश अबकारी विभागाने दिली देशी-विदेशी ब्रँडच्‍या दराची यादी | पुढारी

मतदारांना करा दारु वाटप! छिंदवाड पालिका उमेदवारांना मध्‍य प्रदेश अबकारी विभागाने दिली देशी-विदेशी ब्रँडच्‍या दराची यादी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
आपल्‍याकडे निवडणुका म्‍हटलं की, मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी विविध आमिष दाखविण्‍यात येतात. निवडणूक प्रचार काळात होणारी दारु वाटप हा तर नेहमीच वादाचा आणि चर्चेचा विषय होतो. आता मध्‍य प्रदेशमधील छिंदवाडा नगर पालिका निवडणुकांमध्‍ये उमेदवार हे मतदारांना दारु पाजू शकतात. मात्र याचा खर्च त्‍यांना आपल्‍या निवडणूक खर्च तपशीलामध्‍ये द्‍यावा लागणार आहे, असा अजब निर्णय अबकारी विभागाने घेतला आहे. मतदारांना दारु वाटपाला देण्‍यात आलेल्‍या परवानगीचा निर्णय वादाच्‍या भाेवर्‍यात सापडला आहे.

अबकारी विभागाने प्रसिद्ध केली २५० ब्रँडची यादीच!

नगर पालिका निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला खर्चाचा सर्व तपशील निवडणूक आयोगाला द्‍यावा लागतो. तसेच उमेदवाराला कशावर किती खर्च करता येईल, याचीही नियमावली जिल्‍हा प्रशासन देते. आता राज्‍यातील अबकारी विभागाने  छिंदवाड नगर पालिका निवडणुकीत उमेदवारांना मतदारांना देण्‍यात येणार्‍या दारुचे २५० ब्रँडची यादीच दिली आहे. या यादीत देशी-विदेशी बँड असून त्‍याच्‍या किंमतीही देण्‍यात आल्‍या आहेत. मतदारांना दारु वाटप केल्‍यानंतर याचा खर्च उमेदवारांनी आपल्‍या खर्च तपशीलामध्‍ये नमूद करावा,  असेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

काँग्रेसकडून तीव्र विरोध, आदेश रददची मागणी

छिंदवाड नगर पालिका निवडणुकीत दारु वाटपाला परवानगी देण्‍याच्‍या निर्णयाचा काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. निवडणूक काळात अशा प्रकारे दारुचे दरच सांगणे आणि उमेदवारांना दारु वाटपला परवानगी देणे, हा आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. यामुळे दारु विक्रीला प्रोत्‍साहन मिळणार आहे, अशी तक्रार मध्‍य प्रदेश काँग्रेसचे निवडणूक प्रभारी जेपी धनोपिया यांनी केली आहे. याप्रकरणी  छिंदवाडचे सहायक अबकारी आयुक्‍त माधुसिंह भयढिया यांच्‍यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे.  हा आदेश तत्‍काळ रद्‍द करावा, कारण ही परवानगी घटनाबाह्य असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

हेही वाचा :

 

Back to top button