टेरेसवरील हॉटेल, बार पालिकेच्या ‘रडार’वर; आठवड्यात तीन हॉटेलवर कारवाई | पुढारी

टेरेसवरील हॉटेल, बार पालिकेच्या ‘रडार’वर; आठवड्यात तीन हॉटेलवर कारवाई

पुणे: पुढारी वृत्तसेवा: शहरातील अनेक इमारतींच्या टेरेसवर अनधिकृतपणे चालविले जाणारे हॉटेल, रेस्टॉरंट व बार महापालिकेच्या रडारवर आले आहेत. महापालिकेच्या बांधकाम विभागाने आठवडाभरात अशा प्रकारे चालविल्या जाणार्‍या 8 हॉटेलांवर कारवाई केली आहे. तसेच, 35 हॉटेल मालकांना नोटीस दिल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. महापालिका सभागृहाची मुदत संपून प्रशासनराज आल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांकडून अनधिकृत गोष्टींवर धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाकडून विविध ठिकाणी कारवाई मोहीम राबविली जात असताना, आता बांधकाम परवाना विभागानेही कारवाई मोहीम हाती घेतली आहे. इमारतीच्या टेरेसवर हॉटेल सुरू करण्यास बांधकाम विभागाने केवळ 9 परवानग्या दिल्या आहेत, तर टेरेसवर हॉटेल सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाकडे 8 अर्ज आले आहेत. मात्र, शहरात 73 इमारतींच्या टेरेसवर हॉटेल, टेस्टॉरंट व बार चालविले जातात.

या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने इमारतींच्या टेरेसवरील अनधिकृत हॉटेलवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
आठ दिवसांत 8 हॉटेलवर कारवाई केली असून, 32 हॉटेल मालकांना नोटीस दिल्या आहेत. सात हॉटेलचे मालक न्यायालयात गेले असून, न्यायालयाने ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याचे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

Back to top button