नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात (Gold prices today) मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या (Gold prices today) स्पॉट दरात ०.७ टक्के घसरण दिसून येत आहे. यामुळे सोन्याचा दर प्रति औंस १,७७४.४१ डॉलरवर आला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).
आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या दरातदेखील घसरण झाली आहे. ही घसरण १.६ टक्के असून चांदीचा दर प्रति औंस २३.१० डॉलरवर आला आहे.
बुधवारी एमसीएक्सवर गोल्ड फ्यूचरमध्ये ०.२९ टक्के घसरण झाली. यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे ४७,१४१ रुपयांवर आला. तर चांदीच्या भावात १.२६ टक्के घसरण होऊन तो प्रति किलो ६२,४३२ रुपयांवर स्थिर झाला.
कमोडिटी मार्केटधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोने तेजीत राहण्यासाठी त्याचा दर १,८०० डॉलरवर राहणे महत्वाचे आहे. पण सध्या त्यात घसरण होताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत सोने ४५,६०० (प्रति १० ग्रॅम) रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यात सुधारणा होऊन सोने ४७ हजारांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी सोन्याने ५६,२०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. यंदा त्यात तब्बल ९ हजार रुपयांनी घसरण झाली आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक वृद्धीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम कमोडिटी मार्केटवर होताना दिसत आहे.
सोन्याचा दर आता उतरत असला तरी दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५० हजारापर्यंत जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. सोन्याचा दर ९५० रुपयांनी घसरला होता. तर चांदी तब्बल ४,१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.