नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी; आमदारांच्या केसांनाही धक्का लागला तर... | पुढारी

नारायण राणे यांची शरद पवारांना धमकी; आमदारांच्या केसांनाही धक्का लागला तर...

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या गुवाहाटीत सुरक्षित असले तरी त्यांना मुंबईत यावेच लागणार आहे. त्यांना त्यांच्या कृत्याची किंमत मोजावीच लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यावर पलटवार करीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, अशी धमकी दिली आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत बंडखोर शिंदे गटातील आमदारांना मुंबईत येऊ द्या, त्यातील अनेक आमदार एकनाथ शिंदेंचा पाठिंबा काढून घेतील. तसेच आम्ही बहुमत सिद्ध करू, असा दावा केला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी एक ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, ‘माननीय शरद पवारसाहेब या सर्वांना धमक्या देत आहेत. सभागृहात येऊन दाखवा, असे आव्हान देत आहेत. पण हे आमदार येणारच आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल.’

या ट्विटपाठोपाठ रात्री 9.30 वाजता राणे यांनी आणखी एक ट्विट केले. त्यात ते म्हणतात, आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे. त्यामुळे कामाच्या आणि कार्याच्या बढाया मारू नयेत. काही जणांनी अनेकवेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी, नको त्या वयात धमक्या देणे शोभत नाही.

Back to top button