गोवा : पावसाची सर्वत्र संततधार | पुढारी

गोवा : पावसाची सर्वत्र संततधार

पणजी , पुढारी वृत्तसेवा :  मान्सूनला सक्रिय करणारा ‘शीअर झोन’ तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याने सोमवारी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. आज (मंगळवार) आणि 24 रोजी (शुक्रवार) मुसळधार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच आजपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यताही व्यक्‍त करण्यात आली आहे.

सोमवारी पेडणे, म्हापसा, पणजी, जुने गोवा, मडगाव, सांगे, केपे, काणकोण, सत्तरी येथे पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी झाडे पडून किरकोळ नुकसानीच्या घटना घडल्या. संध्याकाळी 7.30 पर्यंत म्हापसा येथे सर्वाधिक 48 मि.मी. पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल पेडण्यात 37 तर मुरगावमध्ये 30 मि.मी. पावसाची नोंद झाली.
राजधानी पणजी येथे सकाळपासून पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी पावसाचा जोर वाढला होता. पावसामुळे अनेकांनी चारचाकीला प्राधान्य दिल्याने सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतूक संथ गतीने सरकत होती. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.

Back to top button