संजय शिरसाट म्हणजे दगड, लायकी नसताना मुलालाही निवडून दिले : शिवसेनेचे प्रत्युत्तर | पुढारी

संजय शिरसाट म्हणजे दगड, लायकी नसताना मुलालाही निवडून दिले : शिवसेनेचे प्रत्युत्तर

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहून उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका केली तसेच शिवसेनेत लोकनियुक्त आमदारांपेक्षा ठाकरे यांच्या भोवतालच्या बडव्यांचीच चलती असल्याचाही गंभीर आरोप केला. त्यावर आता शिवसेनेने ही शिरसाट यांना पत्रानेच प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद पश्चिम या त्यांच्या मतदारसंघातील एक शिवसैनिक अशा नावाने हे पत्र सेनेच्या गोटातून व्हायरल करण्यात आले आहे. संजय शिरसाट हे आम्हाला दाखविलेला दगड होता, आम्ही ३ वेळा आमदार केले. त्यांचा मुलगा सिध्दांत यालाही लायकी नसताना नगरसेवक म्हणून निवडून दिले, असे या पत्रात म्हटले आहे.

पत्रातील मजकूर काय आहे…

प्रिय,

संजय शिरसाट जी…

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आपण लिहिलेल्या पत्राबाबत आपल्याच मतदार संघातील एका शिवसैनिकाच्या भावना..

आमचे वडील सांगतात आपण सक्रिय राजकारणात येण्याआधी रिक्षा चालक होता आणि आपणही हे अनेक वेळा जाहीररित्या बोलून दाखवले आहे. संभाजीनगर स्थानिक शिवसेना नेत्यांवर विश्वास ठेऊन आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पक्षाच्या, लोकप्रतिनिधी पदाच्या अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि आपण सर्वसाधारण रिक्षावालापासून ३ वेळेस आमदार झालात.

शिरसाट जी हेच नाही तर आपण आपल्या मुलालाही आमची इच्छा नसताना आमच्यावर लादले. त्याचा भयानक त्रास सहन करूनही आम्ही मेहेनत करून जनतेच्या साथीने त्यालाही लायकी नसताना निवडणूक दिले.

हे सगळं फक्त शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांच्या प्रेमाखातर…

संजय शिरसाट म्हणजे आमच्यासाठी फक्त शिवसेनेने दाखवलेला दगड…

याचा प्रत्यय तुम्हाला २०१९ सालच्या निवडणुकीत आला आहे. संजय शिरसाट या नावाला जनतेचा प्रचंड विरोध होता. जनतेचाच काय तुमच्या जिवाभावाच्या सहकाऱ्यांनी सुद्धा आपली साथ सोडली होती. त्यासाठी पण अनेक कारणं होती. जेव्हा तुमच्या विरोधात सगळे उभे होते आता तुम्ही ज्यांच्या सोबत So called हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत जाणार आहात त्या भाजपने राजू शिंदे नावाचा भाजपचा माजी उपमहापौर आपल्या विरोधात उभा केला. देवेंद्र फडणवीस स्वतः राजू शिंदे यांच्या संपर्कात होते. पैशांचा मोठा बाजार झाला अनेक दिग्गज मंडळीनी आपल्याला पाडण्यासाठी कंबर कसली होती. तुमच्याच जवळच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आपणही निवडणूक काळात अनेक वेळा “रात्रीच्या” वेळी रडलात, हतबल झालात!

अगदी निकालाच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही विजयाची आशा सोडली होती. पण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेला चमत्कार आपल्यासाठी सुद्धा आश्चर्यकारक होता याचे आम्ही सगळे शिवसैनिक साक्षीदार आहोत. तो सर्व चमत्कार फक्त आणि फक्त आपल्याला शिवसेनेचा दगड समजून केलेल्या शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे.

शिवाजीनगर, पदमपुरा अशा अनेक भागातून आपल्याला लीड मिळालेली मतं ही शिवसेनेची होती; संजय शिरसाटची नाही, हे संभाजीनगर पश्चिममधील प्रत्येक मतदार, शिवसैनिक सांगू शकतो. असो बोलण्यासारखं खूप काही आहे…

तुम्ही उद्धवसाहेब भेटत नाही म्हणता. काल त्यांनी, ते का भेटत नव्हते हे सांगितले.

तुम्ही मतदारांना न भेटता अनेक “रात्री” मुंबईला कुठे घालवता याची कल्पना सर्वांना आहे. आपले अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले फक्त आणि फक्त शिवसेनेच्या आपुलकी पोटी. आमच्या जीवावर तुम्ही निवडून आलात. तर अमाच्याही भावना आता ऐकून घ्या. आम्ही शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या सोबत आहोत आणि सदैव राहणार…

अजून जे काही मनात आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बोलू.

लोभ असावा…

शिवसैनिक पदमपुरा,
संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ

Back to top button