नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या (COVID19) संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९,९२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १७ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ७,२९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ७९,३१३ सक्रिय रुग्ण आहेत. मंगळवारी दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.५५ टक्के एवढा होता. तर कोरोनामुक्तीदर ९८.१६ टक्के आणि मृत्यू दर १.२१ टक्के होता. आतापर्यंत ५ लाख २४ हजार ८९० जणांचा कोरोनाने बळी घेतला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
रविवारी दिवसभरात १२ हजार ७८१ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर,१८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान, ८ हजार ५३७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली होती. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.६१ टक्के नोंदवण्यात आला होता. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर ४.३२ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर २.६२ टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरु करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९६ कोटी ३२ लाख ४३ हजार ००३ डोस देण्यात आले आहेत. यातील १३ लाख डोस काल एका दिवसात देण्यात आले आहेत. तर ३.५७ कोटी पहिले डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ४ कोटी १५ लाख ४८ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १२ कोटी ७५ लाख ३ हजार २०५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे २,३४५ नवे रुग्ण आढळून आले. त्यात मुंबईतील १,३१० रुग्ण आहेत. राज्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाने १ लाख ४७ हजार ८८८ जणांचा बळी घेतला आहे.